मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू
सन्नी माने, राहुल गायकवाड व वामन कसबे यांच्या वारसांच्या खात्यात मदतीची १० लाख रुपये रक्कम जमा, उर्वरित लाभार्थ्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात....
पिंपरी, ता. २२ जुलै २०२६ :- मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ९ नागरिकांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने हाती घेण्यात आली असून, कागदपत्रांची पूर्तता झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात आर्थिक मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
याअंतर्गत मृत सन्नी माने यांच्या कायदेशीर वारसांना एकूण १० लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली असून, त्यांच्या पत्नी मनीषा सन्नी माने यांच्या खात्यात ५ लाख रुपये, तर आई फौजिया अझीम माने यांच्या खात्यात ५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच मृत राहुल गायकवाड यांच्या कायदेशीर वारसांना एकूण १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली असून, त्यांच्या पत्नी भाग्यश्री राहुल गायकवाड यांच्या खात्यात ५ लाख रुपये, तर आई सरस्वती गायकवाड आणि वडील अर्जुन गायकवाड यांच्या खात्यात प्रत्येकी २.५० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. याशिवाय मृत वामन कसबे यांच्या कायदेशीर वारस असलेल्या त्यांच्या पत्नी सुमन वामन कसबे यांच्या खात्यात १० लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे.
यापूर्वी मृत अक्षय सावंत यांच्या कायदेशीर वारसांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यातही नियमानुसार १० लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे.
दुर्घटनेत मृत्यू झालेल्या भावेश वाणी, सुनील कोरके, महेश कुंभार, नागेश गायकवाड आणि रणजीत पाटील यांच्या कायदेशीर वारसांच्या कागदपत्रांची पडताळणी व आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, ती पूर्ण होताच त्यांच्या खात्यातही नियमानुसार आर्थिक मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध...
''मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी प्राधान्याने करण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच पात्र वारसांच्या खात्यात आर्थिक मदतीची रक्कम थेट जमा केली जात आहे. उर्वरित दुर्घटनाग्रस्तांचीही प्रक्रियाही अंतिम टप्प्यात असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. बाधित कुटुंबांना या कठीण प्रसंगी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.''
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
''मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने दिलासा मिळावा, ही महानगरपालिकेची भूमिका आहे. कोणत्याही पात्र लाभार्थ्याला आर्थिक मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी प्रशासनाला त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व पात्र वारसांना नियमानुसार आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल.''
- रवी लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका