PCMC चा 44 वा वर्धापन दिन 12 ऑक्टोबरला; विविध कार्यक्रमांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

PCMC चा 44 वा वर्धापन दिन 12 ऑक्टोबरला; विविध कार्यक्रमांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

पिंपरी | 17 सप्टेंबर 2026 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा 44 वा वर्धापन दिन विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच अधिकारी-कर्मचारी केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेचा वर्धापन दिन दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. यंदा 11 ऑक्टोबर रोजी रविवार आणि साप्ताहिक सुट्टी असल्याने मुख्य वर्धापन दिन कार्यक्रम सोमवार, 12 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे.

महापौर रवि लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी आणि प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे.

वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या बैठकीला सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, कला, क्रीडा, सांस्कृतिक व पर्यटन समितीचे सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, प्रभाग अध्यक्ष निखील बो-हाडे, नगरसदस्य राजू मिसाळ, विकास साने, निलेश तरस, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, उपायुक्त पंकज पाटील, अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

वर्धापन दिनानिमित्त नगरीचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. रक्तदान शिबिर, कर्मचारी ऑर्केस्ट्रा, महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष उपक्रम, पाककला व रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, रस्सीखेच आणि अन्य क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन प्रस्तावित आहे.

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्याचेही नियोजन आहे. तसेच वर्षभरातील विकासकामे, प्रकल्प, योजना आणि नागरिकाभिमुख उपक्रमांची माहिती सोशल मीडिया आणि शहरातील व्हीएमडीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

महापौर रवि लांडगे यांनी वर्धापन दिन हा शहराच्या 44 वर्षांच्या विकासात्मक वाटचालीचा आढावा घेण्याबरोबरच या प्रवासात योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाच्या कार्याची दखल घेण्याचा प्रसंग असल्याचे म्हटले आहे. नागरिकांचा सहभाग, लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून आगामी काळात अधिक सक्षम, गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासन देण्यास प्राधान्य राहील, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories