पिंपरी-चिंचवड : तळेगाव दाभाडेत एका जेष्ठ नागरिकाला मारहाण करून कारची धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या धडकेत जेष्ठ नागरिकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून या प्रकरणी दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडेतील, ज्ञानेश्वर नगर परिसरात राहणारे संभाजी तात्याबा राऊत (वय 60) यांना मारहाण करून कारने धडक दिल्याची तक्रार आहे. तक्रारीनुसार, राहुल बिराजदार (रा. तळेगाव दाभाडे) याच्याविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राऊत हे किराणा सामान आणि दूध घेण्यासाठी दुकानात गेले होते. खरेदी केल्यानंतर त्यांनी दुकानदाराकडे कॅरीबॅग मागितली. त्यावेळी दुकानदाराचा मुलगा बिराजदार याने घरातून बाहेर येऊन शिवीगाळ केला. तसेच त्यांना हाताने मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
राऊत सामान घेऊन निघाले असताना राहुलने समोरून पांढऱ्या रंगाची कार त्यांच्या अंगावर घातल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्याने जमिनीवरील दगड उचलून राऊत यांना मारण्याचा प्रयत्न केला. राऊत यांचा मुलगा रामलिंग याने हाताने दगड अडवला असता तो त्याच्या डाव्या कोपराला लागल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्यानंतर बिराजदार कार घेऊन तेथून निघून गेल्याचे राऊत यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी 24 नोव्हेंबर रोजी भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 115(2), 351(2), 352 नुसार गुन्हा नोंदवला आहे. दाभाडे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक देगडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.