पिंपरी-चिंचवड : बाणेरमध्ये मुंबईहून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहेय एका ट्रकने अॅक्टिव्हाला पाठीमागून जोदरार धडक दिली असून या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर रोजी पहाटे 1.45च्या सुमारास मुंबईहून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा भीषण अपघात घडला. या मार्गावर आपुलकी हॉस्पिटलसमोरील उड्डाणपुलावर एका ट्रकने अॅक्टिव्हाला पाठीमागून धडक दिली. या धडकेत स्वयम सागर येवले (वय 18) याचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र वरद विनोद पाटील (वय 18, रा. आकुर्डी) किरकोळ जखमी झाला.
पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, वरद आणि स्वयम अॅक्टिव्हावरून जात असताना ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. ट्रक चालक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव आणि बेदरकारपणे चालवण्यात आल्याचा आरोप वरदने तक्रीरात केला आहे. या धडकेत स्वयम गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. वरदलाही दुखापत झाली, तसेच अॅक्टिव्हाचे नुकसान झाले.
वरदच्या तक्रारीवरून बावधन पोलिसांनी ट्रकचालक दादा पांडुरंग गायकवाड (वय 49, रा. अतिट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील कलम 281, 106(1), 125(अ), 324(4) आणि मोटार वाहन कायद्यातील कलम 184, 119/117 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक ठाकरे पुढील तपास करत आहे.