पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि देशाचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक कार्याचे स्मरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान, सहकार चळवळीला दिलेले बळ, शैक्षणिक आणि औद्योगिक विकासासाठी केलेले कार्य यांचा शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी आपल्या मनोगतात उल्लेख केला.
लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी विचारांच्या जपणुकीसाठी यशवंतराव चव्हाण यांनी केलेले कार्य देशाच्या कायम स्मरणात राहील. महाराष्ट्राच्या विकासाचा भक्कम पाया रचताना त्यांनी सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य दिले. त्यांचे विचार आणि कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी व्यक्त केली.
या अभिवादन कार्यक्रमाला काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शाहबुद्दीन शेख, गांधी विचार प्रचारक बी. आर. माडगूळकर, हिराचंद जाधव, हरीश डोळस, आलोक लाड, जहीर शेख, कबीर मोहम्मद, डेनिस देवनसन, प्रवीण कांबळे, मेहबूब शेख, लक्ष्मण म्हेत्रे, जैनुद्दीन करगार, सार्थक बाराथे यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.