'फ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नाल्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई, नाल्यामधील पाइप काढून संपूर्ण नाला खुला

'फ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नाल्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई, नाल्यामधील पाइप काढून संपूर्ण नाला खुला

 'फ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नाल्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई, नाल्यामधील पाइप काढून संपूर्ण नाला खुला

सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नालेसफाईची मोहीम राबवून पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आयुक्तांचे निर्देश

पिंपरी, दि. २३ जुलै २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने ज्ञान प्रबोधिनी शाळा, मोरे वस्ती, गणेश नगर परिसरातील नाल्यावर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान नाल्यामध्ये टाकण्यात आलेले अनधिकृत पाइप काढून टाकण्यात आले असून संपूर्ण नाला खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

ही कारवाई फ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान उपअभियंता हेमंत घोड, कनिष्ठ अभियंता कुंभार, अतिक्रमण निरीक्षक गणेश तीकोणे, बीट निरीक्षक प्रफुल भोकरे, साईनाथ देसाई, ऐश्वर्या मासाळ तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कारवाईसाठी अतिक्रमण विभागाचे ५ पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १७ जवान आणि महानगरपालिकेचे ५ मजूर सहभागी झाले होते. सदर कारवाईसाठी २ जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला.

महानगरपालिकेकडून पावसाळ्यात पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अबाधित ठेवण्यासाठी नाले, ओढे व जलवाहिन्यांवरील अनधिकृत अतिक्रमणांविरुद्ध अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


“पावसाळ्यात नाल्यांमधील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहावा, यासाठी शहरातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नालेसफाई आणि नाल्यांवरील अडथळे दूर करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून अशी मोहिम इतर क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतही सातत्याने राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी नाल्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे अनधिकृतपणे पाइप किंवा इतर कोणतेही बांधकाम करू नये. नागरिकांच्या सहकार्यामुळेच पावसाळ्यात पूरस्थिती टाळण्यास आणि शहरातील जलनिस्सारण व्यवस्था सक्षम ठेवण्यास मदत होईल.

- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories