पिंपरी-चिंचवड : सुसगावात जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाच्या घरात घुसून त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 7च्या सुमारास मुळशी तालुक्यातील सुसगावात शितळादेवी मंदिराजवळ ही घटना घडली.
मूळचा धुळे जिल्ह्यातील दिपक गोपीचंद पानपाटील (वय 21, सध्या रा. सुसगाव) याने त्याला मारहाण करण्यात आल्याची तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीवरून सुरज सर्जेराव पंडीत (रा. सुसगाव), राज दातीर व माऊली काळभोर (दोघे रा. रावेत), आदित्य सोनावणे आणि राहुल टकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज हा दिपकच्या ओळखीचा आहे. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी सुरज आणि दिपकमध्ये भांडण झालेले होते. या भांडणाचा राग मनात धरून सुरज गाडीत दोन लोखंडी कोयते आणि चार जणांना घेऊन घरी आल्याचा आरोप दिपकने केला आहे. त्यानंतर त्याच्यासोबत आलेल्या चौघांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश करून दिपकला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दिपकने तु इतरांना घेऊन घरात का आलासा विचारले असता सुरजने शिवीगाळ करत तु काय करणार आहे, मी आमदाराचा भाऊ आहे, कुठल्यापण चौकीत जा, मी बघतो काय करायचे ते अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा मारण्यासाठी दिपकच्या अंगावर धावून आला.
या प्रकरणी बावधन पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी भारतीय न्याय संहिता कलम 333, 115(2), 352, 351(1) 189(2), 189(4), 191(2), 191(3) आणि शस्त्र अधिनियम कलम 4(25) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील 1951 चे कलम 37(1)(3) तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्ष सुरासे या प्रकरणाचा पुढील तपसा करत आहेत.