माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना शहरात जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी, ता. २२ जुलै २०२६ - माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आज बुधवारी (ता. २२) जयंतीनिमित्त शहरात अभिवादन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासकीय कार्यालयात अजितदादांच्या प्रतिमेस लोकप्रतिनिधी व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि योगदान कायम प्रेरणादायी राहील, अशी भावना लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली.
याप्रसंगी आयुष्मान भारत योजना महाराष्ट्र प्रदेश प्रमुख मा. डॉ. ओमप्रकाश शेटे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे,उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, शहराध्यक्ष भा.ज.पा. शत्रुघ्न काटे, महिला व बालकल्याण सभापती राणी पठारे, गटनेते शिवसेना विश्वजीत बारणे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सदाशिव खाडे, राम वाकडकर उपस्थित होते.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आमदार शिवाजीराव गर्जे, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ जितेंद्र भोळे, सचिव-४ शिवदर्शन साठ्ये तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांची जयंती विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना आणि कार्याला उजाळा दिला.
कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कष्टकरी, कामगार बांधव,रिक्षाचालक, व फेरीवाला बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवंगत अजितदादा पवार यांनी राज्याच्या पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, कृषी, सहकार आणि शहरी विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विकासकामांतील निर्णयक्षमता, प्रशासनातील कार्यक्षमता आणि जनतेच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची त्यांची कार्यपद्धती विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी असेल, अशी भावना कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रमुख काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केली.