क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - २२ जुलै २०२६

क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - २२ जुलै २०२६

क्राइम रिपोर्ट 

शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - २२ जुलै २०२६

➡️ हिंजवडीत सायबर फसवणूक प्रकरणी महिलेवर गुन्हा

स्वतःचे बॅंक खाते सायबर फसवणुकीसाठी वापरण्यास देऊन त्याद्वारे १ लाख ३० हजारांचे आर्थिक व्यवहार करुन त्यातील ४० हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी  केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा आर्थिक व्यवहार ३ मार्चला घडलेला आहे. 

या प्रकरणी पोलिस हवालदार आर. बी. गोडांबे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्वेता प्रसाद आगळे (रा. आगळेवस्ती, चांदखेड, ता. मावळ) असे आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या बँक खात्याचा वापर सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी करण्यास साथीदारांना दिला. केरळ, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक येथील एनसीसीआरपी तक्रारींशी संबंधित फसवणुकीतील एकूण १ लाख ३० हजार रुपयांच्या व्यवहारांपैकी ४० हजार रुपये आरोपीने एटीएमद्वारे काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपी महिले विरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३१७(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ महाळुंगे एमआयडीसीतील कंपनीच्या साडेचार लाखांच्या साहित्याचा अपहार, चालकाविरुद्ध गुन्हा

महाळुंगे एमआयडीसी परिसरातील टाटा टोयो रेडिएटर लिमिटेड कंपनीचे सुमारे ४४ हजार ४३६ रुपयांचे साहित्य कंपनीत जमा न करता स्वतःजवळ ठेवून अपहार केल्याप्रकरणी पिकअप वाहनचालकाविरुद्ध उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी उमेश चंद्रकांत शिंदे (वय ४३, रा. ब्राम्हणवाडी, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल पांडूरंग शिर्के (वय २७, रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै ते २० जुलै २०२६ या कालावधीत टाटा टोयो रेडिएटर लिमिटेड, कोरेगाव येथील कंपनीचे साहित्य पिकअप वाहनाद्वारे वाहतूक करण्यासाठी आरोपीकडे देण्यात आले होते. यामध्ये टियागो मॉडेलच्या फॅन मोटर श्राउड असेंब्लीचे १० नग (किंमत ११,८६० रुपये) तसेच एक्स-१०४ डिझेल मॉडेलच्या फॅन मोटर श्राउड असेंब्लीचे १६ नग (किंमत ३२,५७६ रुपये) असे एकूण ४४ हजार ४३६ रुपयांचे साहित्य होते.

मात्र, आरोपीने विश्वासाने ताब्यात दिलेले हे साहित्य कंपनीत जमा न करता स्वतःजवळ ठेवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीची फसवणूक करत अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (२१ जुलै) दुपारी २.२२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार मोरमारे करीत आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ पिंपरीतील खात्याचा सायबर फसवणुकीसाठी वापर, एकावर गुन्हा

 संत तुकारामनगर परिसरातील एका बँक खात्याचा संघटित सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी वापर केल्याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिसांनी एका व्यक्तीसह त्याच्या साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी  पोलिस शिपाई, संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे पोलिस शिपाई संकेत भागुजी नवले (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी रॉन्नी हेनरी पॉवेल (वय ५३, रा. वल्लभनगर, संत तुकारामनगर, पिंपरी) व त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर २०२५ ते २९ जून २०२६ या कालावधीत सुखवानी कॅम्पस, संत तुकारामनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील आरोपीच्या खात्याचा सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी वापर करण्यात आला. आरोपीने साथीदारांशी संगनमत करून संघटित सायबर गुन्हेगारी गटाचा सदस्य म्हणून हे खाते वापरल्याचा आरोप आहे.

तपासात आंध्र प्रदेशातील ईस्ट गोदावरी जिल्ह्यातील एनसीसीआरपी तक्रारीतील तक्रारदाराची ४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम संबंधित खात्यात जमा झाल्यानंतर धनादेशाद्वारे काढून घेण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ बँक खाते उपलब्ध करून देत ऑनलाइन फसवणुकीस मदत; एकावर गुन्हा

ऑनलाइन आर्थिक फसवणुकीसाठी स्वतःच्या नावावरील बँक खाते उपलब्ध करून देत देशातील नऊ नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिस शिपाई आकाश उत्तम कांबळे (बक्कल क्र. ३४९२, दिघी पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ज्ञानेश्वर नारायण कुलकर्णी (रा. धावडे वस्ती, पीएमपीएमएल चौकाजवळ, भोसरी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपीने बँक ऑफ इंडियामध्ये स्वतःच्या नावाने उघडलेल्या बँक खात्याचा वापर सायबर फसवणूक करणाऱ्या साथीदारांच्या संगनमताने केला. या खात्यावर देशातील नऊ नागरिकांची फसवणूक करून एकूण २१ हजार ६०६ रुपये ७१ पैसे जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीविरुद्ध मंगळवारी (२१ जुलै) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहाणे करीत आहेत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 

➡️ सायबर फसवणुकीप्रकरणी एकावर गुन्हा

 सायबर फसवणुकीत वापरण्यात आलेल्या बँक खात्यातून तब्बल ५ लाख ७७ हजार ६८५ रुपये आर्थिक व्यवहार झाल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य अशोक पाटणकर (रा. फ्लॅट क्र. बी-७, गंगोत्री हाइट्स, श्रीराम कॉलनी, जाधववाडी, चिखली) याने IDFC First Bank मध्ये खाते उघडून साथीदारांशी संगनमत केल्याचा आरोप आहे. या खात्याच्या माध्यमातून सायबर फसवणुकीतील ५ लाख ७७ हजार ६८५ रुपये व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात देशातील दोन नागरिकांची फसवणूक झाल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.

याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार आकाश ज्ञानेश्वर नायकोजी यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ 

➡️ रावेतमध्ये बॅनरच्या वादातून तरुणावर खुर्चीने हल्ला

रावेत परिसरात बॅनर लावण्याच्या चर्चेतून झालेल्या वादात चौघांनी एका तरुणाला हाताने व खुर्चीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी (दि. २०) रात्री घडली. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार दिलीप खिलारे (वय २६, रा. साईनाथनगर, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास मुकाई चौक ते भक्ती-शक्ती चौक बीआरटी मार्गावरील आर. जे. कॅफे येथे फिर्यादी व त्यांचा मित्र अनिस हे बॅनर लावण्यासंदर्भात चर्चा करत होते. त्यावेळी शेजारच्या टेबलावर बसलेल्या आरोपींपैकी एकाने "तुमची लायकी आहे का, तुम्ही बॅनर लावू शकता का," असे म्हणत वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

फिर्यादी यांनी शिवीगाळ करू नये, असे सांगितल्याचा राग आल्याने आकाश राऊत (पूर्ण नाव व पत्ता अपूर्ण), अक्षय हिप्परकर (रा. अँड्रस वन सोसायटी, रावेत), आदित्य (पूर्ण नाव माहीत नाही, रा. अँड्रस वन सोसायटी, रावेत) व 'बुटया' (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांनी संगनमताने फिर्यादीला हाताने तसेच खुर्चीने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला व डाव्या हाताच्या दोन बोटांना गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपींनी धमकी देत तेथून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११७(२), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आवारे करीत आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ ताथवडे येथे कोयता बाळगणाऱ्या तरुणावर गुन्हा

पिंपरी : पोलीस आयुक्तालय हद्दीत लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून लोखंडी कोयता बाळगणाऱ्या एका तरुणाविरुद्ध वाकड पोलिसांनी भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई सोमवारी (२१ जुलै) दुपारी सुमारे ४.१० वाजता ताथवडे येथील 'द स्पेक्ट्रम' सोसायटीलगतच्या रस्त्यावर करण्यात आली. अभिषेक सिद्धाराम मौसलगी (वय २४, रा. शिवप्रेमी नगर, गायकवाड इस्टेट, पुनावळे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई कौतेंय शिरीष खराडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार आयुक्तालय हद्दीत शस्त्रे अथवा इजा करण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई असताना आरोपीकडे सुमारे ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता आढळून आला. तो काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी वाकड पोलिसांनी भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ पिंपरीत तलवारीसह तरुण ताब्यात, शस्त्रबंदी आदेशाचा भंग

शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही धारदार लोखंडी तलवार जवळ बाळगल्याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिसांनी एका ३६ वर्षीय तरुणाविरुद्ध भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २१) दुपारी २.३६ वाजण्याच्या सुमारास हाफकिन कंपनीच्या गेटसमोर, वल्लभनगर (पिंपरी) येथे अमोल बाळू जाधव (वय ३६) याच्याकडे सुमारे एक हजार रुपये किमतीची धारदार लोखंडी तलवार आढळून आली. त्या वेळी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने लागू केलेला शस्त्रबंदी आदेश प्रभावी असतानाही आरोपीने तलवार बाळगून आदेशाचे उल्लंघन केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

याप्रकरणी पोलीस शिपाई अमोल उत्तम काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५(२) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

➡️ चिखलीतून होंडा ॲक्टिव्हा चोरीला

स्पाईन रोड परिसरातील भीमशक्ती नगर येथे पार्क केलेली होंडा ॲक्टिव्हा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा किसन मुरगुंड (वय ३०, रा. भीमशक्ती नगर, मोरे वस्ती, चिखली) यांनी त्यांची होंडा ॲक्टिव्हा (क्रमांक एमएच १४ एलझेड २९६३) १७ जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सुमन पानटपरीसमोर, स्पाईन रोडवरील भीमशक्ती नगर ते कृष्णानगर चौकाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर लॉक करून पार्क केली होती.

१८ जुलै रोजी पहाटे चार वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने संमतीशिवाय दुचाकी चोरून नेली. याबाबत २१ जुलै रोजी चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) तसेच भारतीय दंड विधान कलम ३७९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास चिखली पोलिस करीत आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories