news
clock
उद्यान विभागाच्या देखभाली अभावी झाडे जळाली, पिंपळे गुरव परिसरातील झाडांची स्थिती

उद्यान विभागाच्या देखभाली अभावी झाडे जळाली, पिंपळे गुरव परिसरातील झाडांची स्थिती

उद्यान विभागाच्या देखभाली अभावी झाडे जळाली, पिंपळे गुरव परिसरातील झाडांची स्थिती 

पिंपरी, ता. २१ - सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. मात्र या उन्हात रस्त्यांवरच्या झाडांकडे प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. पिंपळे गुरव परिसरातील रामनगर ते सीएमई सैन्य दलाच्या सीमेलगत जाणाऱ्या रस्त्यावरची  ५ ते १५ फूट उंचीपर्यंत वाढ झालेली सुमारे २५ झाडे पाण्याअभावी जळून गेली आहेत. या प्रकाराबद्दल नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. उद्यान विभागाने जागे होऊन तातडीने पाणी द्यावे व ही  झाडे वाचवावीत,अशी मागणी केली आहे.

मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी प्रशासनावर टीका करत, ''आजचे वृक्षारोपण व संरक्षण म्हणजे उद्याच्या पिढीसाठी ऑक्सिजनची हमी आहे. मात्र प्रत्यक्षात झाडांची अशी अवस्था होत असेल तर हे दुर्दैवी आहे.  उद्यान विभागाने तातडीने लक्ष देऊन झाडे वाचवावीत. ''

संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड यांनी कामचुकार अधिकारी व ठेकेदारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ''अधिकारी फक्त आश्वासन देतात, प्रत्यक्षात कारवाई होत नाही.'', अशी टीका केली.

पदपथ विकसित करताना झाडांच्या बुंध्याभोवती सिमेंटचे आवरण दिल्याने मुळांना वाढण्यासाठी जागा मिळत नाही, तसेच पाणी व मातीची कमतरता निर्माण होते. परिणामी झाडे कोमेजून जळण्याच्या घटना वाढत असल्याचे नागरीकांनी सांगितले. दरम्यान, वृक्षमित्र अरुण पवार यांनी झाडांना टँकरद्वारे पाणी देण्याचे आश्वासन दिले असून गरज पडल्यास तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. 

 अण्णा जोगदंड, संजना करंजावणे, काळुराम लांडगे, संगीता जोगदंड, गजानन गजानन, मुरलीधर दळवी, सामाजिक कार्यकर्ते अरविंद मांगले, जालिंदर दाते, संजय कांबळे, गणेश वाडेकर, पंडित वनस्कर, रितेश वनस्कर, महेश राऊत यांनी या विषयाबाबत आवाज उठवला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories