महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे आणि प्रतिभा शिंदे चर्चेत
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे आणि प्रतिभा शिंदे चर्चेत
पुणे, ता. २१ - नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भोंदूबाबाची पूजा करतानाची छायाचित्रे समोर आल्याने त्यांना आपल्या पदाचा राजीनाम द्यावा लागला आहे. चाकणकर यांनी शुक्रवारी (ता. २०) आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्त केला आहे. आता, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी वैशाली नागवडे आणि प्रतिभा शिंदे यांची चर्चेत आहेत.
वैशाली नागवडे आणि प्रतिभा शिंदे या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आहेत. वैशाली नागवडे यांची महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक खंबीर अशी ओळख आहे. त्या प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात सक्रिय आहेत. त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे. राज्य दूध महासंघाच्या (महानंद) अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून त्यांनी राहू-खामगाव गटाचे प्रतिनिधित्व केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्या वैशाली या आहेत.
दुसरे नाव म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे. शिंदे यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये काँग्रेसचा राजीनामा देऊन अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला. नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतिभा शिंदे या 'लोक संघर्ष मोर्चा' संघटनेच्या माध्यमातून सातपुडा पट्ट्यातील आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढत आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी अनेक जनआंदोलनांचे नेतृत्व केले. आदिवासी नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अशीही त्यांची ओळख आहे.