पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीचा गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला तिढा अखेर सुटला आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वतीने स्वीकृत सदस्यपदासाठी सात जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या संदर्भात पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी नावांची अधिकृत घोषणा केली आहे.
महापालिकेच्या संख्याबळानुसार भाजपाच्या वाट्याला सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला तीन अशा 10 स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपकडून सात जणांची नियुक्ती करण्यात आली असून यात जयनाथ काटे, राजेश पिल्ले, विशाल कलाटे, कुणाल लांडगे, कुलदीप परांडे, ऋषिकेश म्हेत्रे आणि सचिन साठे यांचा समावेश आहे.
नवनियुक्त स्वीकृत सदस्यांचा कार्यकाळ 15 महिन्यांचा असणार आहे. भाजपच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल प्रशांत शितोळे यांनी सांगितले. नवनियुक्त स्वीकृत सदस्यांचे अभिनंदन करताना, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि अनुभवाचा पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच मोठा लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा झाल्याने महापालिकेतील रखडलेल्या नियुक्ती प्रक्रियेला गती मिळाली असून, या निवडीमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. आगामी काळात नव्या नगरसेवकांकडून कोणते मुद्द मांडले जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.