पिंपरी : निगडी ते मोरवाडी मेट्रो मार्गावरील टिळक चौक ते मोरवाडी दरम्यानच्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून डांबरीकरण करावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांची पुणे येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले आहे.
बाबर यांनी निवेदनात नमूद केले आहे की, मेट्रोच्या कामामुळे टिळक चौक ते मोरवाडी दरम्यानच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक, पादचारी आणि परिसरातील नागरिकांना प्रवास करताना अडचणी येत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून अपघातांचाही धोका वाढला आहे. दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचेही त्यांनी म्हटले.
शर्मिला बाबर यांनी संबंधित रस्त्यांची पाहणी केली असून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याची मागणीही केली आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवून त्यांचे डांबरीकरण करण्यास प्राधान्य द्यावे, अशी भूमिका त्यानी मांडली. तसेच मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी योग्य सुरक्षा उपाययोजना आणि वाहतूक व्यवस्थापन करण्याची सूचनाही त्यांनी केली.
मेट्रोच्या कामामुळे नागरिकांची गैरसोयीचा होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे बाबर यांनी निवेदनात नमूद केले आहे. रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे आणि डांबरीकरणाची कामे विनाविलंब पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.