आषाढी वारी पालखी सोहळ्यात सासवड–जेजुरी मार्गावर वारकऱ्यांना ट्रकची धडक, तीन महिलांचा मृत्यू
आषाढी वारी पालखी सोहळ्यात सासवड–जेजुरी मार्गावर वारकऱ्यांना ट्रकची धडक, तीन महिलांचा मृत्यू
पिंपरी, ता. १३ जुलै २०२६ - आषाढी वारी पालखी सोहळ्यात सोमवारी (ता. १३) दुर्घटना घडली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरातून मार्गस्थ होत असताना ट्रकने मागून वारकऱ्यांना धडक दिली. या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला व 16 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने साधारण ५०० मीटर अंतरावर हॉटेल शिपदीप लॉजिंगच्या समोर हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. धडक इतकी भीषण होती की, तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला, त्या सांगलीच्या रहिवासी होत्या. राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे, नंदा पवार अशी मृतांची नावे आहेत. आणखी ३ ते ४ वारकरी गंभीर जखमी आहेत.
नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिशीकर यांच्या दिंडीच्या ट्रकला अपघात झाला आहे. ट्रक चालकाला ताप आल्यामुळे त्याने गोळ्या घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला ग्लानी आली, अशी प्राथमिक माहिती आहे.
याबाबत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, ''सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात ज्या तीन वारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.
जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही, याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्याची काळजी घ्यावी. जखमी भगिनी लवकर बऱ्या व्हाव्यात, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.''