पिंपळे गुरवमध्ये जागेच्या वादातून राडा ; ज्येष्ठ नागरिकासह कुटुंबीयांना दमदाटी

पिंपळे गुरवमध्ये जागेच्या वादातून राडा ; ज्येष्ठ नागरिकासह कुटुंबीयांना दमदाटी

पिंपळे गुरव | २७ नोव्हेंबर २०२६ : जागेवर हक्क सांगत जमावाने पत्र्याचे शेड आणि गेटची तोडफोड केल्याची घटना पिंपळे गुरव येथे घडली आहे. यावेळी एका ज्येष्ठ नागरिकासह त्यांच्या कुटुंबातील महिलांना शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आल्याचाही आरोप आहे. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.५३ ते दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.

या प्रकरणी रमेश शंकर जाधव (वय ७१, राहणार पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किसन लक्ष्मण चव्हाण आणि सुनील भास्कर काळे (दोघे राहणार पिंपळे गुरव) यांच्यासह सात पुरुष आणि पाच अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील सर्व्हे क्रमांक ३३/१/१ मधील जागेवर किसन चव्हाण आणि सुनील काळे हे इतर सात ते आठ पुरुष आणि चार ते पाच महिलांचा जमाव घेऊन आले. संबंधित जागा सर्व्हे क्रमांक ३३/१/४ मध्ये असल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी जमावाने संबंधित जागेवरील पत्र्याचे शेड आणि गेट तोडून नुकसान केले. तसेच फिर्यादी जाधव आणि त्यांच्या कुटुंबातील महिलांना शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी सांगवी पोलिसांनी गुरुवारी (२६ नोव्हेंबर) भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९१(२), १९०, ३२४(४), ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories