व्यवस्थापनाच्या बेशिस्तपणामुळे 'घरकुल वसाहत-मनपा' बससेवेचा खेळखंडोबा, प्रवाशांना विनाकारण सहन करावा लागतोय त्रास
व्यवस्थापनाच्या बेशिस्तपणामुळे 'घरकुल वसाहत-मनपा' बससेवेचा खेळखंडोबा, प्रवाशांना विनाकारण सहन करावा लागतोय त्रास
पिंपरी, ता. १६ जुलै २०२६ - 'पीएमपी'च्या बससेवेतील घरकुल वसाहत ते मनपा (मार्ग क्रमांक ३२३ - अ) या मार्गावरील बससेवा अतिशय बेशिस्तीने चालवली जात आहे. स्वारगेट मुख्यालयापर्यंत अनेकदा तक्रारी नोंदवूनही चालक-वाहक-स्टार्टर यांचा बेशिस्तपणा तसाच सुरु आहे. सदर मार्गावर अक्षरशः एकच बस असून ती देखील अचानक रद्द केली जाते, पर्याय दुसरी बस उपलब्ध करुन दिली जात नाही, आमच्याकडे गाडीच नाही अशी उत्तरे अधिकारी देतात. हा प्रकार गेली ४-५ वर्षे प्रवासी सहन करत आहेत. अखेर काल बुधवारी रात्री असाच प्रकार घडल्याने प्रवाशांनी 'पीएमपी'च्या नेहरुनगर डेपोचे व्यवस्थापक शैलेंद्र नाईक यांना रस्त्यातून रात्री पावणेनऊला फोन करुन तक्रार केली. त्यांनी 'दोन दिवसांत दुसरी गाडी देऊ' असे सांगून विषय मिटवला पण त्यानंतरही घरकुलला जाणारी बस मार्गावर आणलीच नाही.
काल बुधवार १५ जुलैचा प्रसंग असा की, पुणे मनपा बस स्थानकावर रात्री आठ वाजता 'घरकुलचे लोक कोणीही थांबू नका, गाडी नाही' असे सांगितले. 'गाडी का येणार नाही', असे प्रवाशांनी विचारले असता 'आम्हाला माहिती नाही, गाडी सकाळपासून आलेलीच नाही', असे उडवाउडवीचे उत्तर देत स्टार्टर केबिनमध्ये बसलेले कर्मचारी हसू लागले. ''तुम्ही फोन करुन विचारा'', असे प्रवाशांनी सांगितल्यावरही ते हसतच राहिले आणि ''गाडी बंद आहे सांगितलं ना'', एवढेच उत्तर त्यांनी दिले.
त्यानंतर, ''दुसऱ्याच बसच्या वाहकाने घरकुल बस दुपारी बंद पडली होती. '' असे सांगितले. त्यानंतरही संबंधित स्टार्टरने फोन करुन विचारण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे बस बंद पडली होती तर ती दुपारीच दुरुस्त का केली नाही किंवा शेवटच्या रात्रीच्या फेरीला दुसरी बस का पाठवली नाही, याचे उत्तर कोणाही दिले नाही.
या आधी तीन-चार दिवसांपूर्वीही असाच प्रकार घडला तेव्हा कंडक्टरने सीक रिपोर्ट लिहून दिला म्हणून शेवटची फेरी रद्द केली असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. हे सीक रिपोर्टचे कारणही बऱ्याचदा देऊन या गाडीच्या फेऱ्या अचानक रद्द केल्या जातात. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी खात्याकडे काय एकच कंडक्टर आहे का असा प्रश्न विचारला आहे.
गेल्या महिन्यात मनपाहून घरकुलला निघालेली बस कासारवाडीत बंद पडली तेव्हा कंडक्टरने दुसरी गाडी न बोलवता, चिखलीच्या गाडीत बसवून दिले. चिखलीची गाडी ही घरकुलला जात नाही. मग, तिथे जवळच असलेल्या नेहरुनगर डेपोतून बस बोलावणे अपेक्षित होते. कारण, केएसबी चौक-शिवतेजनगर मार्गे घरकुलला जाणारी घरकुल-मनपा ही एकमेव बस आहे. मात्र, कंडक्टरने जबाबदारी झटकली आणि प्रवाशांना मी काही करु शकत नाही असे सांगून तिथेच सोडून दिले. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. त्याच्या आधी शिवाजीनगर पसिसरातच रात्री बस पडल्यावरही प्रवाशांना तिथेच सोडून दिले होते.
अशी ही घरकुल वसाहत ते मनपा बसची (मार्ग क्रमांक ३२३ अ) कैफीयत आहे. या मार्गावर एकच बस आहे. तिच्या सकाळच्या सत्रात तीन व दुपारनंतर तीन फेऱ्या असतात. शेवटची बस पुणे मनपा बसस्थानकातून रात्री साडेआठला घरकुलसाठी सुटते, खात्याच्या गलथानपणामुळे शेवटची फेरी रद्द केल्यावर, त्याचा त्रास प्रवासी विनाकारण सहन करत आहेत. घरी पोचायला रात्रीचे साडेदहा वाजतात, पास असतानाही पैसे खर्च होतात. त्यामुळे यापुढे, एकच असलेली बस आणली नाही तर बस येईपर्यंत आम्ही रात्रभरही बस स्थानकात बसून राहू, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली आहे.
अधिकारी म्हणतात....
याबाबत, प्रवाशांशी बोलताना नेहरुनगर डेपोचे व्यवस्थापक शैलेंद्र नाईक म्हणाले की, ''येत्या दोन दिवसांत दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या बस पाठवण्याची व्यवस्था करु. बुधवारी घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा करु.'' तर 'पीएमपी'चे वाहतूक व्यवस्थापक यशवंत हिंगे यांनी ''माहिती घेतो'' असे सांगितले आहे.