चार दिवसांत ६९ स्कूल बस-व्हॅनवर पोलिसांची कारवाई, ३ लाख ७६ हजारांचा दंड वसूल
पिंपरी, ता. २२ जुलै २०२६ - शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने ने-आण करणाऱ्या एकूण ६९ वाहनांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेने व आरटीओच्या वायुवेग पथकाने कारवाई करुन ३ लाख ७६ हजार ९०० रुपयांची वसुली केली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारी वाहने धोकादायक पद्धतीने वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ पिंपरी-चिंचवड कार्यालयाकडून वायुवेग पथके पाठविण्यात आली. या पथकामार्फत दिनांक २९ जून २०२६, दिनांक ३० जून २०२६, दिनांक २ जून २०२६ व दिनांक २० जुलै २०२६ या चार दिवशी कारवाई करण्यात आली.
या कारवाईत एकूण १८१ वाहनांची तपासणी करण्यात आली. ६९ वाहनांवर कारवाई करण्यात आली आणि ३ लाख ७६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त गुन्हे सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप आयुक्त विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक-२ सत्यजित आदमणे तसेच वाहतूक विभाग प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.