पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा तळाला, पिण्याच्या पाण्याच्या नियोजनावर पाटबंधारे विभागाचे लक्ष केंद्रित
पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा तळाला, पिण्याच्या पाण्याच्या नियोजनावर पाटबंधारे विभागाचे लक्ष केंद्रित
पुणे, ता. २६ - यंदा जून महिना संपत आला तरी आवश्यक तसा पाऊस न पडल्याने पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा तळाला गेला आहे. पुण्यातील मुळशी धरण क्षेत्र वगळता एकाही धरणक्षेत्रात आतापर्यंत शंभर मिलिमीटराहून अधिक पावसाची नोंद झालेली नाही. गेल्यावर्षी जून अखेरीस खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये १२.१९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, यंदा आजअखेर ३.७९ साठा आहे.
जलसंपदा विभागाने गुरुवारी (ता. २५) दिलेल्या आकडेवारीनुसार, पुण्यातील २६ धरणांपैकी केवळ मुळशी, वीर, पवना, निरा देवघर, भाटघर, वरसगाव, पानशेत, भामा आसखेड या धरणांमध्ये तुलनेने समाधानकारक साठा शिल्लक आहे. या धरणांमध्ये किमान एक टीएमसी (अब्ज घनफूट) पेक्षा अधिक पाणी उपलब्ध आहे. यात सर्वाधिक उपयुक्त साठा पानशेत (१.८९ टीएमसी), भाटघर (१.८३ टीएमसी), वीर (१.६६ टीएमसी) आणि पवना (१.५३ टीएमसी) या धरणांमध्ये आहे.
सध्याच्या मर्यादित साठ्यामुळे पुणे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले की, आमचे संपूर्ण लक्ष पिण्याच्या पाण्याच्या नियोजनावर केंद्रित आहे. पुणे शहर तसेच धरणसाखळीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागाला किमान ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, या दृष्टीने नियोजन केले आहे. हवामान विभागाच्या पावसाच्या अंदाजावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू असला, तरी अद्याप धरणांमध्ये नवीन पाणी आलेले नाही.
धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी -
- माणिकडोह - ४.२१ टक्के
- येडगाव - २१.७८ टक्के
- वडज - २५.२५ टक्क्के
- डिंभे - २.६४ टक्के
- विसापूर - १३.९३ टक्के
- चिल्हेवाडी - १९.५८ टक्के
- कळमोडी - १६.३१ टक्के
- चासकमान - ५.६९ टक्के
- भामा आसखेड - २८.७९ टक्के
- आंद्रा - २६.१६ टक्के
- वडिवळे - ४३.५३ टक्के
- पवना - १८.०२ टक्के
- मुळशी - १०. ४९ टक्के
- कासारसाई - २०.११ टक्के
- गुंजवणी - १८.१० टक्के
- निरा देवघर - ८.७९ टक्के
- भाटघर - ७.७९ टक्के
- वीर - १७.६७ टक्के
- उजनी - २६.२८ टक्के