लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना १०६ व्या जयंतीनिमित्त घरकुल वसातहतील नागरिकांचे अभिवादन
पिंपरी, ता. १ ऑगस्ट २०२६ - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना १०६ व्या जयंतीनिमित्त घरकुल वसातहतील नागरिकांनी अभिवादन केले. जगविख्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, घरकुल यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. चिखली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत जाधव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक परिवर्तनासाठीच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले.
पोलिस निरीक्षक रणजीत जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात अण्णाभाऊ साठे यांनी कष्टकरी, वंचित आणि शोषित समाजाच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी आपल्या साहित्याच्या माध्यमातून उभारलेला संघर्ष आजही समाजाला प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. त्यांच्या विचारांचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत होणे ही काळाची गरज असून, सामाजिक समता आणि बंधुभावाची मूल्ये जपण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदानाला उजाळा देण्यात आला. विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. समाजात शिक्षण, समता आणि परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी अण्णा भाऊ साठे यांचे विचार अंगिकारण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
या जयंती सोहळ्यात नागिरक, युवक तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. संपूर्ण घरकुल परिसर अण्णाभाऊ साठे यांच्या जयघोषाने दुमदुमून गेला असून सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुरेश वैरागर,नरसिंग वैरागर,सतीश रिठे,अशोक भिसे, विलास गडसिंग, संदीप रोकडे, भगवान आढागळे, बजरंग जाधव, पोपट आरणे, कीर्ती जाधव, रोहिणी रोकडे, अरुणा भोसले, मयुरी भोसले, तेजस्विनी भोसले, सुरेखा देवगिरे, वंदना जाधव, सारिका जाधव, विष्णू निकाळजे, शुभांगी मोरे, जाधव काकू, कापसे साहेब,सोमनाथ कांबळे, गणपत जाधव,राहुल मोरे,नामदेव रिटे यांनी संयोजन केले.