ताथवडेतील अत्याचार प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून कठोर शिक्षा द्या, 'मनसे'ची मागणी
ताथवडेतील अत्याचार प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून कठोर शिक्षा द्या, 'मनसे'ची मागणी
पिंपरी, ता. १ ऑगस्ट २०२६ - ताथवडे-वाकड परिसरातील दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीवर फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
मनसेने निवेदनात म्हटले आहे की, शहरात महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपींवर POCSO कायद्यान्वये कठोर कलमे लावून फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवावा, विशेष सरकारी वकील नियुक्त करावा आणि पीडित कुटुंबाला वैद्यकीय उपचार, समुपदेशन, कायदेशीर तसेच आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
यासोबतच शहरातील शाळा, वस्त्या आणि निर्जन भागांमध्ये पोलीस गस्त वाढविणे, सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि निर्भया पथकाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या प्रकरणात तातडीने ठोस कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र रस्ता आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी छावा संघटनेचे धनाजी येळकर, मनसेचे राजू सावळे, सिद्धेश सोनकवडे, प्रबुद्ध कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.