पिंपळे सौदागर येथे नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची मोफत ओपीडी सेवा सुरू
डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी आणि नाना काटे सोशल फाउंडेशन यांचा पुढाकार
पिंपरी, ता. १ ऑगस्ट २०२६ - डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी आणि नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ केंद्र, पिंपळे सौदागर येथे नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची मोफत ओपीडी सेवा सुरू करण्यात आली.
नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले.
१ ऑगस्ट २०२६ पासून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी ही सेवा उपलब्ध राहणार असून, परिसरातील नागरिकांना स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, अस्थिरोग, कान-नाक-घसा तसेच सर्वसाधारण आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्याची सुविधा या ओपीडीच्या माध्यमातून मिळणार आहे.
यासोबतच या उपक्रमांतर्गत डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पिंपरी येथे महिलांच्या प्रसूती व त्यासंदर्भात आवश्यक शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून, गरजू कुटुंबांसाठी ही अत्यंत दिलासादायक आणि लोकहिताची सेवा ठरणार आहे.
नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज आणि परवडणाऱ्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा उपक्रम निश्चितच अनेक कुटुंबांसाठी आधारवड ठरेल, असे काटे यांनी सांगितले.
याप्रसंगी हॉस्पिटलचे डीन व प्राचार्य डॉ. प्रशांत खाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ममता नाकाळे, डॉ. नीलिमा धारकर, डॉ. केतन जंगले, डॉ. इंद्रजीत घाडगे, डॉ. संपदा वैद्य, डॉ. आरती जाधव, व्यवस्थापक भूषण कुदळे, युवा नेते उमेश काटे, ह.भ.प. विलास अण्णा काटे, पोपटभाऊ जगताप, राजू टकले, संदीप जगताप, प्रतीक काटे, अतुल माने, उमेश इनामके,चेअरमन विशाल जाधव, सेक्रेटरी मिलिंद माने, खजिनदार मनीष दारक, सनक्रिस्ट सोसायटी सभासद,डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, स्टाफ, नर्सेस तसेच परिसरातील नागरिक व सोसायटी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.