चऱ्होली खुर्द | २० ऑक्टोबर २०२६ : सोसायटीमध्ये पाणीटंचाई असताना बोअरवेलच्या पाण्याने वाहन धुण्यावरून दोन गटांत वाद होऊन मारहाण झाल्याची घटना चऱ्होली खुर्द येथील अभिमान श्री सोसायटीमध्ये घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी दिलेल्या फिर्यादींवरून आळंदी पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात राहुल माधवराव शिंपाळे (वय ३३, रा. अभिमान श्री सोसायटी, चऱ्होली खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. २० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सोसायटीच्या बोअरचे पाणी नळाला पाइप लावून वाहन धुण्यासाठी वापरले जात होते.
त्यावेळी निलेश चव्हाण यांनी सोसायटीमध्ये पाणीटंचाई सुरू असून, व्हॉट्सॲप ग्रुपवरही सूचना दिली असल्याने पाइप लावून गाड्या धुवू नयेत, असे सांगितले. मात्र, वाहन धुणाऱ्या व्यक्तींनी त्यास विरोध केल्याने वाद झाला.
या वादातून सचिन कोठावडे (४६), विवेक कोठावडे (१८), कुणाल कोठावडे (२०), आशिष भालेराव (२८) आणि गणेश धातपांडे (२२) यांनी फिर्यादी राहुल शिंगाळे तसेच निलेश शिवाजी चव्हाण (३५) आणि प्रांजय तानाजी भालेराव (३५) यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच बकेटने डोक्यात मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात सचिन मच्छिंद्र कोठावडे (वय ४६, रा. अभिमान श्री सोसायटी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची MH14 JP9730 क्रमांकाची रिक्षा सोसायटीच्या बी विंगमधील पार्किंगमध्ये पाण्याच्या नळाजवळ बकेटमध्ये पाणी घेऊन धुतली जात होती.
यावेळी निलेश चव्हाण (३४), राहुल शिंपाळे (३३), रविंद्र बढाणे (३१), विवेक पवार (३३) आणि प्रांजय भालेराव (३५) यांनी फिर्यादी सचिन कोठावडे, त्यांची पत्नी आणि मुले कुणाल व विवेक यांना हाताने तसेच बकेटने मारहाण केल्याचा आरोप आहे.
तसेच कोठावडे कुटुंबीय MH14 JN3214 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना, त्यांना अडवून सोसायटीचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले आणि शिवीगाळ करून धमकी दिल्याचे दुसऱ्या फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७९/२०२६ आणि ५८०/२०२६ नोंदविण्यात आले आहेत. दोन्ही बाजूंच्या आरोपांचा पोलीस तपास करत आहेत.