तळेगाव दाभाडे | २० ऑक्टोबर २०२६ : व्हॉट्सॲपवर ठेवलेल्या स्टेटसच्या रागातून तळेगाव दाभाडे येथील शिवाजी चौकातील कपड्याच्या दुकानात एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांविरोधात तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र किशन जाधव (तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. जाधव हे तळेगाव दाभाडे येथील शिवाजी चौकातील ‘आफ्टर लुक’ कपड्याच्या दुकानात काम करत होते.
फिर्यादीच्या ओळखीतील तीन विधिसंघर्षग्रस्त बालके २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास दुकानात आली. त्यापैकी एकाने जीन्स पॅन्ट विकत घ्यायची असल्याचे सांगितले. जाधव जीन्स पॅन्ट दाखवत असताना संबंधित बालकाने अचानक कोयता काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी जाधव यांच्या मामाचा मुलगा रुद्र संतोष कांबळे आणि त्याचा मित्र प्रतीक बाळू तातळे हे दोघे जण प्रशांत शिंगाडे यांच्या खुनाच्या गुन्ह्यातून बालसुधारगृहातून सुटले होते. त्यानंतर त्यांनी मोबाईलवरील व्हॉट्सॲप स्टेटसवर ‘किंग इज’ असे ठेवले होते. याच स्टेटसचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
जाधव दुकानाबाहेर पळत असताना दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनी त्यांना अडवून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिसऱ्याने कोयत्याने डोक्यावर आणि मानेवर वार करून गंभीर जखमी केले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११६(२), ३(५) तसेच भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४(२५), २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.