news
clock
मराठी भाषा संवर्धनाची व मराठी साहित्याची गोडी सर्वसामान्यांमध्ये निर्माण करणे हेच उद्दीष्ट - योगेश सोमण

मराठी भाषा संवर्धनाची व मराठी साहित्याची गोडी सर्वसामान्यांमध्ये निर्माण करणे हेच उद्दीष्ट - योगेश सोमण

मराठी भाषा संवर्धनाची व मराठी साहित्याची गोडी सर्वसामान्यांमध्ये निर्माण करणे हेच उद्दीष्ट - योगेश सोमण 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान

पिंपरी, ता. ४ - ''महाराष्ट्र साहित्य परिषद ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महिनाभरात कामाची ठोस दिशा निश्चित केली जाईल. मराठी भाषा संवर्धनाची आणि मराठी साहित्याची गोडी जनसामान्यात निर्माण करणे, हे आमचं मुख्य उद्दिष्ट असेल.'' असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण यांनी सांगितले. 

कला, साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या ‘कलारंग’ सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत नवनिर्वाचित ठरलेल्या पदाधिकाऱ्यांचा आणि सहकाऱ्यांचा ‘सारस्वतांचा गौरव सोहळा’ शुक्रवारी (ता. ३) निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. 

कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे तसेच उपस्थित सर्व मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन झाली. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.  महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह  स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष  प्रदीप निफाडकर यांचा तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीतील सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, अंजली कुलकर्णी, प्रसाद मिरासदार, माधव राजगुरु, डॉ. नितीन संगमनेरकर, डॉ. आशुतोष जावडेकर, राजन लाखे, पुरुषोत्तम काळे आणि प्रभाकर ओव्हाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण यांनी मनोगत व्यक्त केले. सोमण म्हणाले, ''येत्या पाच वर्षांत आपण जी दिशा ठरवणार आहोत आणि ज्या पद्धतीने काम करणार आहोत, त्यात या सर्वांचा सहभाग कसा राहील, हे पाहणे ही माझी प्राथमिक जबाबदारी असेल. पुढील काळात भाषेचे संवर्धन आणि साहित्याची गोडी जनमानसात निर्माण करण्यासाठी आम्ही एक वर्षाचे सूक्ष्म नियोजन करणार आहोत. मराठी भाषेचे संवर्धन आणि साहित्याची गोडी जनसामान्यात निर्माण करणे, हे आमचं मुख्य उद्दिष्ट असेल. आजचे जे ३०-३५ वयोगटातील तरुण आहेत, जे काही कारणास्तव मराठी साहित्यापासून थोडे दुरावले आहेत, त्यांना पुन्हा वाचनाकडे वळवणे आणि त्यांच्या मनात मराठी भाषेबद्दलची गोडी निर्माण करणे, हे प्राधान्य असेल. यासाठी ‘अभिवाचन’ सारख्या कार्यशाळा सुरु करण्याचा आमचा मानस आहे. 

ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले, ''महाराष्ट्र्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्यिक उपक्रम राबवण्याची गरज आहे. ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ आणि चोखोबा या संतांनी एकत्रितपणे अभंग-ओव्यांच्या माध्यमातून जनसामान्यांचे विचार मांडल. हेच विचार विचार पुढे नेण्याचे कार्य महाराष्ट्र साहित्य परिषदेनेही करावे.''

आमदार अमित गोरखे यांनी आगामी १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पिंपरी-चिंचवड शहरात व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. साहित्यिक हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात. अशा विद्वान व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणे हे आमचे भाग्य असून, पिंपरी-चिंचवड शहराच्या साहित्य व सांस्कृतिक चळवळीला यामुळे नवी ऊर्जा मिळेल, असे गोरखे म्हणाले. 

‘कलारंग’ संस्थेचे अध्यक्ष आमदार अमित गोरखे, उपाध्यक्ष शैलेश लेले, सदस्य आशा नेगी आणि संजना मगर ,राम गायकवाड,प्रवीण पोळ, मुकुंद वेदपाठक यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.  रविंद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. संयोगिता खुडे यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories