पिंपरी-चिंचवड | २६ नोव्हेंबर २०२६ : चिंचवड स्टेशन परिसरात देशभक्तीपर गीतानंतर महापौरांनी हिरवा झेंडा दाखवला आणि विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक भीमसृष्टीच्या दिशेने धावू लागले. संविधान दिनानिमित्त शहरात प्रथमच आयोजित ‘संविधान सन्मान दौड २०२६’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन यांनी संयुक्तपणे या दौडीचे आयोजन केले होते.
दौडीपूर्वी चिंचवड स्टेशन येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महापौर रवि लांडगे यांनी दौडीला हिरवा झेंडा दाखवला. आमदार शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दौडीत सहभागी झाले.
भीमसृष्टीत प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन
पिंपरीतील भीमसृष्टी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. उपस्थितांनी त्यांच्यासोबत प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. त्यानंतर दौडीचा समारोप झाला.
संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव ठेवून प्रत्येकाने लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. संविधानातील स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही मूल्ये दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन आमदार शंकर जगताप यांनी केले. यावेळी ‘पाणी वाचवा, भविष्य घडवा’ हा संदेश देण्यात आला. ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत स्वच्छ आणि हरित पिंपरी-चिंचवड घडवण्याचा संकल्पही करण्यात आला.