'सत्यमेव जयते फार्मर कप २०२६' स्पर्धेचा प्रारंभ
पुणे, ता. २९ - पानी फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित ‘फार्मर कप २०२६’ चा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी नुकताच करण्यात आला.
यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, पानी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान, अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यावेळी उपस्थित होते. झूम लिंकद्वारे राज्यातील शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
" 'सत्यमेव जयते फार्मर कप २०२६' ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे. आजचे १८ हजार शेतकरी गट पुढील काळात ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील.", असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
" 'सत्यमेव जयते फार्मर कप २०२६' या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वासच भविष्यातील कृषी परिवर्तनाचा पाया ठरेल. फार्मर कपमधील १८ हजार शेतकरी गट हे महाराष्ट्रातील शेती क्रांतीचे शिल्पकार ठरणार आहेत, त्यांच्या अनुभवातून लाखो शेतकरी प्रेरणा घेतील. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे.", मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले
"एकत्रितपणे शेती केल्यास आणि सामूहिक प्रयत्नातून शेतीचे नियोजन केल्यास उत्पादनवाढीसह शेतकऱ्यांचे उत्पन्नही निश्चितपणे वाढू शकते. फार्मर कप उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या उमेद आणि आत्मविश्वासाचा संचार झाला आहे.", असे कृषिमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.