१५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाइन बदल्या
पुणे, ता. २९ - परिवहन विभागातील बदली प्रक्रियेत पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा नवा आदर्श निर्माण करत १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या शून्य मानवी हस्तक्षेप असलेल्या ऑनलाईन बदली प्रक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आल्या.
दरम्यान परिवहन विभागाने नव्याने खरेदी केलेल्या ५७ पर्यावरणपूरक ई-वाहनांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते ताडदेव येथील मोटार परिवहन कार्यालयात करण्यात आले.
"सन २०२२ पासून परिवहन विभागात ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत कोणताही मानवी हस्तक्षेप, लाचखोरी किंवा भ्रष्टाचाराला थारा मिळू नये, यासाठी शासन कटिबद्ध आहे. यंदा आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या पूर्णपणे संगणकीकृत आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्या. यामुळे बदली प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होईल." – मंत्री प्रताप सरनाईक