रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शुक्रवार (ता. ५) आणि शनिवारी (ता. ६) वाहतूकीत बदल
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शुक्रवार (ता. ५) आणि शनिवारी (ता. ६) वाहतूकीत बदल
पुणे, ता. ३ - अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगडावर शुक्रवार (ता. ५) आणि शनिवारी (ता. ६) शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त गर्दी उसळणार असल्याने प्रशासनाने या भागातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले आहेत. तमाम शिवभक्तांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित व्हावा तसेच संभाव्य कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी ४ वाजल्यापासून शनिवारी (ता. ६) रात्री १० वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
बंदी आदेशानुसार मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा-नागोठणे ते कशेडी या पट्टयासह माणगाव-निजामपूर-पाचाड-रायगड किल्ला, माणगाव-ढालघरफाटा-पाचाड-रायगड किल्ला आणि महाड-नाते खिंड-पाचाड-रायगड किल्ला या प्रमुख मार्गावर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजांवर परिणाम होऊ नये, यासाठी दूध, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने तसेच पोलिस, अग्रिशमन दल आणि रुग्णवाहिका यांना या बंदीतून वगळण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीसमितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती आणि युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यात 'धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची', 'जागर शिवशाहिरांचा, स्वराज्याच्या इतिहासाचा आणि 'सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा हे मुख्य आकर्षण आहे. शुक्रवारी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीस्थळी अभिवादन करुन सोहळ्यास प्रारंभ होईल.