फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेतर्फे तळेगाव दाभाडेमध्ये चिमण्यासांसाठी ८३ घरट्यांचे वाटप
पिंपरी, ता. २३ - जागतिक चिमणी दिनानिमित्त तळेगाव दाभाडे येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेने शुक्रवारी (ता. २०) पक्षीप्रेमी नागरिकांना चिमण्यांसाठी कृत्रिम घरट्यांचे वाटप मोफत करण्यात आले. आपल्या घराभोवती चिमण्यांसाठी पोषक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश सोरटे व सचिव सुधाकर मोरे यांनी केले आहे.
गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला यंदाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिमण्यांसाठी सुमारे दीडशे कृत्रिम घरटी तयार करण्यात आली होती. त्यापैकी ८३ घरट्यांचे वाटप करण्यात आले.
चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. पूर्वीप्रमाणे अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा ऐकता यावा, यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे, असे संस्थेचे संस्थापक महेश महाका यांनी सांगितले.