विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी ..... राज्यभरात विद्यार्थी सहाय्यता केंद्रांची सुरवात
विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी ..... राज्यभरात विद्यार्थी सहाय्यता केंद्रांची सुरवात
पुणे, ता. १० - महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रत्येक जिल्ह्यात एक 'विद्यार्थी सहाय्यता केंद्र' आजपासून (ता. १०, बुधवार) सुरु करण्यात येत आहेत. या केंद्रामध्ये विद्यार्थी-पालकांना राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, प्रवेश प्रक्रिया याबाबत अधिकृत माहिती मिळेल. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही केले जाईल. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ४० केंद्र कार्यान्वित होत आहेत. यामध्ये, मुंबईत तीन, पुण्यात दोन आणि नागपूरमध्ये दोन केंद्र असणार आहेत. एकूण ४० केंद्रांपैकी २६ केंद्रांचे काम पूर्ण झाले असून सहा केंद्र अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित आठ केंद्रही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर तसेच जिल्हास्तरीय समन्वयक ऑनलाइन उपस्थित होते.
जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, परीक्षा केंद्र आणि सीईटी कक्ष यांच्यात समन्वय साधणे, परीक्षार्थीना केंद्रीय प्रवेशप्रक्रिया आणि त्यासंदर्भातील तांत्रिक माहिती देणे, विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करणे, तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार, पात्रता आणि क्षमतेनुसार योग्य अभ्यासक्रम आणि शैक्षणिक संस्थांच्या निवडीसाठी मार्गदर्शन करणे, शिष्यवृत्ती योजनांबाबत माहिती देणे, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आणि रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करणे या उद्देशाने केंद्र सुरू करण्यात येत आहेत, असे पाटील यांनी सांगितले.