'पीएमपी'च्या बस डेपोंसाठी २४ जागा तातडीने ताब्यात देण्याची मागणी

'पीएमपी'च्या बस डेपोंसाठी २४ जागा तातडीने ताब्यात देण्याची मागणी

'पीएमपी'च्या बस डेपोंसाठी २४ जागा तातडीने ताब्यात देण्याची मागणी

पिंपरी, ता. २६ जुलै २०२६ - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात पुढील काळात सुमारे दोन हजार नव्या बसची भर पडणार आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) 'पीएमपी'साठी राखीव असलेल्या ३२ जागांपैकी २४ जागा तातडीने ताब्यात देण्याची मागणी 'पीएमपी'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी केली आहे. याबाबत, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील अहवाल ३० दिवसांत सादर करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत.

सध्या पीएमपीच्या ताफ्यात सुमारे १,९०० बस आहेत. मात्र, डेपोमध्ये पुरेशी जागा नसल्याने त्यापैकी अनेक बस रस्त्याच्या कडेला उभ्या कराव्या लागतात. परिणामी बसची नियमित देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षित पार्किंग यावर मोठा परिणाम होत आहे. आगामी काळात आणखी सुमारे दोन हजार नवीन बस ताफ्यात दाखल होणार असल्याने त्या उभ्या करायच्या कुठे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नवीन डेपो उभारण्यासाठी विकास आराखड्यातील आरक्षित जागा तातडीने पीएमपीच्या ताब्यात देण्याची मागणी महामंडळाने केली आहे.

महापालिकेच्या विशेष सभेत सादरीकरण करताना महेश आव्हाड यांनी महापालिकेच्या विकास आराखड्यात 'पीएमपी'साठी सुमारे ९० एकर क्षेत्राच्या ३२ जागा आरक्षित असल्याची माहिती दिली. त्यापैकी २४ जागांची तातडीची गरज असून, बहुतांश जागा खासगी मालकीच्या असल्याने त्यांचे संपादन महापालिकेने करून त्या 'पीएमपी'कडे हस्तांतरित कराव्यात किंवा त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर झालेल्या चर्चेनंतर महापालिका आयुक्तांनी ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories