क्राइम रिपोर्ट -
शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - २६ जुलै २०२६
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 युवकाला लाकडी काठीने जबर मारहाण, दोन युवकांना अटक
''तुम्ही मला शिवी का दिली'', असे विचारल्यामुळे दोन युवकांनी एका युवकाला काठीने जबर मारहाण केली आहे. ही घटना मारुंजी येथील रॅम्बो पीजी परिसरात घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.
याबाबत, मारहाण झालेले रोशन सचिन गायकवाड (वय २१, रा. रॅम्बो पीजी, शिंदेवस्ती, मारुंजी, ता. मुळशी, मूळ रा. जि. नाशिक) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २५ जुलै) पहाटे अडीजच्या सुमारास फिर्यादी रोशन हा मित्रासोबत फोनवर बोलत होता. त्यावेळी आरोपी आकाश सतिश सुरवसे (वय २१, व्यवसाय फोटोग्राफर, रा. डांगे चौक, थेरगाव) व विष्णुकांत दयानंद अंधारे (वय २५, रा. रॅम्बो पीजी, शिंदेवस्ती, मारुंजी) यांनी कोणतेही कारण नसताना त्याल शिवीगाळ केली. रोशनने त्यांन शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता आरोपींना राग आला.
यावेळी आकाश सुरवसे याने लाकडी काठीने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केली, तर विष्णुकांत अंधारे याने हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. या हल्ल्यात रोशन गंभीर जखमी झाला. घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३५२ व ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 भोसरीत बेकायदा देशी दारू विक्रीप्रकरणी एकाला अटक, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त
परवाना नसताना देशी दारूची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर भोसरी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी त्याच्याकडून दारूसह शासनाने प्रतिबंधित केलेले गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण १८ हजार ७९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस हवालदार अशोक आबासाहेब माने (नेमणूक भोसरी पोलिस ठाणे, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जुलै रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास भोसरी येथील जय गणेश पान शॉप, विश्व विलास बिर्याणी हाऊसजवळ आरोपी विश्वंभरनाथ फौजदार यादव (वय ४५, रा. भोसरी, मूळ रा. लातूर) हा विनापरवाना देशी दारूच्या बाटल्या स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करताना आढळून आला.
अन्न व औषध प्रशासनाच्या आदेशानुसार प्रतिबंधित करण्यात आलेले गुटखा, सुगंधी सुपारी व तंबाखूजन्य पदार्थ बाळगल्याचेही तपासात आढळून आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७१, २७२, २७४, २७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 अजमेरा परिसरातून दुचाकी चोरी, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
अजमेरा-पिंपरी परिसरातील वास्तू उद्योग सोसायटीमधून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ जुलै रोजी रात्री १० वाजल्यापासून २५ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अकील निजामुद्दीन अन्सारी (वय ३१, रा. अजमेरा, पिंपरी) यांची काळ्या-निळ्या रंगाची हिरो होंडा सीडी डिलक्स मोटारसायकल ही जर्मन बेकरीसमोरून चोरीला गेली.
या प्रकरणी शनिवारी (ता. २५ जुलै) संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच भारतीय दंड विधान कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 सायबर फसवणूक प्रकरणी तरुण अटकेत, खात्यातून रुपये 1.22 लाखांचा व्यवहार
सायबर फसवणुकीचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी स्वतःचे बँक खाते वापरण्यास दिल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पियुष उमेश जामदार (वय १९, रा. तळवडे गाव) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ डिसेंबर २०२५ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपीने बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्वतःच्या खात्याचा वापर सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी करण्यास दिला. सायबर गुन्हेगारी करणाऱ्या संघटित टोळीतील सदस्य म्हणून संगनमत करून त्याने संबंधित खात्यात तक्रारीतील रुपये १ लाख २२ हजार १०६ इतकी रक्कम स्विकारल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच त्या खात्यातून एटीएम कार्डद्वारे रुपये ६०,००० काढण्यात आल्याचेही उघड झाले आहे.
आरोपीविरुद्ध देहूरोड पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. २५) भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६६(ड) अन्वये देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 ओळखीच्या तरुणाकडून दोन बहिणींना मारहाण, निगडी परिसरातील घटना
ओळखीच्या एका तरुणाने दोन बहिणींना बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी (ता. २५) संग्राम नगर झोपडपट्टी, अकुंश चौका जवळ, ओटा स्किम, निगडी येथे घडली. याबाबत आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी अंजू बापू शेलार (वय ३०, रा. संग्रामनगर झोपडपट्टी, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग चंद्रकांत जाधव (वय २८, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. फिर्यादी अंजू आणि त्यांची बहीण आयशा शाहीद शेख या घरी असताना आरोपी त्यांच्या घरी आला. त्याने अंजू यांना स्वतःसोबत शिवाजीनगर येथे राहण्यास येण्यास सांगितले. मात्र, अंजू यांनी नकार दिल्याने संतापलेल्या आरोपीने दोघींना शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अंजू यांच्या दोन्ही हातांवर नखांनी ओरखडे काढले, केस पकडून कपाळ जमिनीवर आपटले, पाठीवर चावा घेतला आणि घरातील लाकडी दांडक्याने हातावर मारहाण केली. तसेच दोघींनाही जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीला पोलिसांनी अटर केली आहे.
आरोपीविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ११८(१), ३३३, ११५(२), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 दापोडीत अवैध दारू विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई
दापोडी पोलिसांनी अवैधरीत्या विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या एका महिलेवर कारवाई करून रुपये ५,७६० किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे.
पोलिस शिपाई नितीन सुरेश संकुनहट्टे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २५ जुलै) जायका बिर्याणीसमोर, पुणे-मुंबई महामार्गालगत सीएमई गेटसमोरील सार्वजनिक पदपथावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत हेमा विजय सोनवणे (वय ३६, रा. लिंबोरे वस्ती, जुना पुणे-मुंबई महामार्ग, दापोडी) हिच्याकडे विदेशी कंपनीचे मद्य बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी तिच्याकडील रुपये ५,७६० किंमतीचा मद्यसाठा जप्त केला.
या प्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यातील कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 फ्लिपकार्टच्या मालवाहू वाहनातून २४ मोबाईल व कॅमेरा चोरी, चालकाविरुद्ध गुन्हा
फ्लिपकार्ट कंपनीसाठी मालवाहतूक करणाऱ्या वाहनातील तब्बल २४ मोबाईल फोन आणि एक कॅमेरा, असा रुपये ७ लाख ७१ हजार ४०१ किमतीचा मुद्देमाल अपहार केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सनी सुरेश गायकवाड (वय ४०, रा. कुरुळी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव चेतन तुकाराम सावंत (वय २५, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) आहे. फिर्यादी यांच्या मालकीचे महिंद्रा लोडकिंग हे वाहन फ्लिपकार्ट कंपनीच्या मालवाहतुकीसाठी वापरले जात होते. कंपनीच्या सूचनेनुसार वाहन केवळ दोन ठिकाणी थांबविण्याचे निर्देश असतानाही आरोपी चालकाने तळेगावपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील डी.पी. रोड, यशवंतनगर येथे वाहन वारंवार थांबवून ३ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या कंपनीचे २४ मोबाईल आणि एक कॅमेरा असा एकूण रुपये ७ लाख ७१ हजार ४०१ किमतीचा मुद्देमाल फिर्यादीची परवानगी न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आरोपी विरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 सायबर फसवणुकीतील १.३१ लाखांच्या व्यवहारप्रकरणी एकास अटक
दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात सायबर फसवणुकीप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संशयिताने साथीदारांच्या संगनमताने बँक खाते उघडून सायबर गुन्हेगारी टोळीचा सदस्य म्हणून फसवणुकीतील रकमेचे आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.
पोलिस शिपाई राजेंद्र परमेश्वर खेडकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुशांत रविंद्र सोये (वय २९, रा. खराबवाडी, ता. खेड) व त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ जुलै २०२५ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपीने महाळुंगे येछे बॅंकेत खाते उघडले होते. तपासादरम्यान संबंधित खाते सायबर गुन्हेगारीसाठी वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाले. देशभरातील ३५ नागरिकांच्या सायबर फसवणुकीच्या तक्रारींमधील एकूण रुपये १,३१,८८१ रकमेचे व्यवहार या खात्यामार्फत झाल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपीविरोधात दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. २५) भारतीय न्याय संहिता कलम ६१(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० च्या कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------