राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने डॉ. पी. डी पाटील यांना शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान
पिंपरी, ता. २६ जुलै २०२६ - आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पिंपरी येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिर येथे शनिवारी (ता.२५) आयोजित दिंडी व कामगार वारकरी मेळाव्यात डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख कुलपती डॉ पी. डी. पाटील यांचा "शिक्षणमहर्षी" या सन्मानाने गौरव करण्यात आला. या सोहळ्यास चिंचवडचे आमदार शंकरराव जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधान परिषद सदस्या उमाताई खापरे, भाजपचे शहर प्रभारी भरत नाना पाटील, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह अनेक मान्यवर, वारकरी आणि श्रमिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
यशवंतभाऊ भोसले यांनी पी. डी. पाटील यांच्या चार दशकांहून अधिक काळातील शैक्षणिक योगदानाचा गौरव केला ते म्हणाले, "हा पुरस्कार कोणत्याही शासनाचा नाही, तर समाजाचा आहे. डी. वाय. पाटील संस्थेमुळे हजारो सर्वसामान्य, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, आयटी तज्ज्ञ होऊन देश-विदेशात यशस्वी झाले आहेत.'' भोसले यांनी सोशल मीडियातील पत्रकारांसाठी डी. वाय. पाटील संस्थेत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची तसेच पत्रकारांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती यावेळी केली.
सत्काराला उत्तर देताना डॉ पी. डी. पाटील यांनी हा सन्मान आपल्यासाठी अत्यंत भावनिक असल्याचे सांगितले. "मी गेली ४५ वर्षे पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या मार्गदर्शनातून या संस्थेचा विस्तार करण्याची संधी मिळाली. आज जागतिक स्तरावर मान्यता मिळालेल्या संस्थेचा भाग असल्याचा अभिमान वाटतो. हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून याचे श्रेय माझ्या सहकाऱ्यांना आणि समाजाला आहे. शिक्षण महर्षी पुरस्कार दिल्याबद्दल कामगार नेते यशवंतभाऊ भोसले तसेच राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा आभारी आहे, असे ते म्हणाले.
आमदार शंकरराव जगताप यांनी पी. डी. पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, "पिंपरी-चिंचवडची ओळख जगभर पोहोचविण्यात डी. वाय. पाटील संस्थेचे मोलाचे योगदान आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांनी अनेकांचे जीवन घडविले आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यालाही त्यांच्या माध्यमातून शिक्षणाची संधी मिळाली आणि आज तो यशस्वी उद्योजग आहे."राष्ट्रीय श्रमिक आघाडीने सुरू केलेल्या दिंडी उपक्रमाचे कौतुक केले.