घरफोडी चोरी करुन चार महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या चौघांना मुंबई व बेंगळुरुमधून अटक, बिहारमधून एकूण १२ लाख ६० हजार रुपयांचे दागिने जप्त
घरफोडी चोरी करुन चार महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या चौघांना मुंबई व बेंगळुरुमधून अटक, बिहारमधून एकूण १२ लाख ६० हजार रुपयांचे दागिने जप्त
पिंपरी, ता. २६ जुलै २०२६ - खेड तालुक्यातील-मौजे महाळुंगे इंगळे येथील दुकानाचे शटर उचकटून सोन्याच्या दागिन्याची चौरी करणाऱ्या आरोपीला उत्तर महाळुंगे एमआयडीसी गुन्हे शोध पथकाने मुंबई व बेंगळुरु येथून ताब्यात घेतले आहे. या चोरट्यांनी त्यांच्या मूळगावी बिहार येथे लपवलेले १४ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहे.
मौजे महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथे राहणाऱ्या कविता मदन कड या भाजीविक्री करुन त्याच ठिकाणी राहत असलेला दुकानाचा गाळा बंद करुन यात्रे करीता मूळगावी गेल्या असता दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे २ च्या सुमारास अज्ञात चोरटयाने दुकानाच्या गाळ्याचे शटर उचकटले आणि दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करत कविता कड यांच्या कपाटातील सोन्याचे दागिने चोरुन नेले. या तक्रारीवरुन आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेजद्वारे तपास सुरू केला. मात्र, आरोपीबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. पोलिसांना गोपनिय बातमीदारामार्फत दोन संशयित व्यक्तीची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व त्यांचा तिसरा साथीदार निकु सिंग हा चोरीचे सर्व सोने घेऊन मूळ गावी सितामढी, बिहार येथे पळून गेल्याचे सांगितले.
मुख्य आरोपी पोलिसांना चकवा देण्यासाठी बिहार व त्यानंतर कर्नाटक राज्यात लपून राहत होता. तसेच मुख्य आरोपीने चोरीचे दागिने लपविण्यासाठी त्याचा भाऊ रंजन सिंग याचीही मदत घेतल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, दोन्ही भावांच्या ठावठिकाण्याबाबत कोणतीही उपयुक्त माहिती प्राप्त होत नव्हती. तपास पथकाने गुन्हा घडल्यापासून सतत चार महिने पाठपुरावा करत विविध अंगाने तपास करुन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रंजन सिंग याला मुंबई येथून व निकु सिंग यास बेंगळुरु येथून ताब्यात घेतले.
पोलिस कस्टडीतील तपासात त्यांनी मूळगावी बिहार येथे सोन्याचे लपविल्याची कबुली दिल्याने पोलिसांच्या पथकाने बिहार सितामढी येथे आरोपीसह जाऊन तेथून एकूण १२ लाख ६० हजार रुपये किंमतीचे १४ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळविले.
अटक आरोपींची नावे :-
१) निक्कुकुमार देवकी सिंग, वय २२ वर्षे रा. ब्लॉक भाऊर थाना, जि. सितामढी, राज्य बिहार
२) रंजनकुमार देवकी सिंग, वय २० वर्षे रा. ब्लॉक भाऊर थाना, जि. सितामढी, राज्य बिहार
३) राजकुमार ऊर्फ प्रिंन्सकुमार विजय पासवान, वय १९ वर्षे, रा. पत्ता डेहरी ओनसना बाग, विजय पासवान बाग रोहतास, राज्य बिहार
४) डिंपल पटेल विनोद सिंग, वय २६ वर्षे, रा. नसेज, थाना कुदरा, जि. केमल भबुआ राज्य- बिहार
सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलिस आयुक्त प्रादेशिक विभाग बसवराज तेली, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ - ४ श्वेता खेडकर, सहायक पोलिस आयुक्त महाळुंगे विभाग प्रिया डमाळे यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार उत्तर महाळुंगे पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलिस अंमलदार राजू कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, गणेश गायकवाड, संतोष वायकर, मंगेश कदम, हरी रणदिवे, मंगेश घोलप, साहिल सांडभोर, समीर महात तसेच पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ ४ यांचे कार्यालया कडील सहाय्यक फौजदार तुकाराम घुगे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे हे करत आहेत.