पुण्यातील गिर्यारोहक उमेश झिरपे लिखित “पर्वतपुत्र शेर्पा” या  पुस्तकाचा नेपाळी अनुवाद असलेल्या‘शेर्पा – हिमालका सच्चा साहसी’ पुस्तकाचे काठमांडूमध्ये प्रकाशन

पुण्यातील गिर्यारोहक उमेश झिरपे लिखित “पर्वतपुत्र शेर्पा” या पुस्तकाचा नेपाळी अनुवाद असलेल्या‘शेर्पा – हिमालका सच्चा साहसी’ पुस्तकाचे काठमांडूमध्ये प्रकाशन

पुण्यातील गिर्यारोहक उमेश झिरपे लिखित “पर्वतपुत्र शेर्पा” या  पुस्तकाचा नेपाळी अनुवाद असलेल्या‘शेर्पा – हिमालका सच्चा साहसी’ पुस्तकाचे काठमांडूमध्ये प्रकाशन

पुणे, ता. ३० - पुण्यातील प्रख्यात गिर्यारोहक व लेखक उमेश झिरपे लिखित “पर्वतपुत्र शेर्पा” या गाजलेल्या पुस्तकाचा नेपाळी अनुवाद असलेल्या “शेर्पा – हिमालका सच्चा साहसी” या पुस्तकाचे प्रकाशन नेपाळमधील काठमांडू येथे शनिवारी (ता. ३०) करण्यात आले. मूळ मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचा नंतर इंग्रजी अनुवाद झाला आणि आता ते नेपाळी वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. हिमालयीन मोहिमांमधील अनुभव आणि अनेक शेर्पा व्यक्तिमत्त्वांच्या प्रेरणादायी जीवनकथा या पुस्तकात मांडण्यात आल्या आहेत.

हे पुस्तक हिमालयातील खरे नायक असलेल्या शेर्पा समाजाला समर्पित आहे. त्यांच्या साहस, चिकाटी, कौशल्य आणि निःस्वार्थ योगदानामुळे जगभरातील असंख्य गिर्यारोहकांना जगातील सर्वोच्च शिखरांवर जाण्याची संधी मिळाली आहे. अनेक शेर्पा व्यक्तिमत्त्वांच्या प्रेरणादायी जीवनकथा या पुस्तकात मांडण्यात आल्या आहेत.

या पुस्तकाचे नेपाळी भाषांतर आणि संपादन कुंभराज राई यांनी केले आहे. हे पुस्तक नेपाळी भाषेत यावे यासाठी ज्येष्ठ गिर्यारोहक अंग बाबू शेर्पा यांनी विशेष पुढाकार घेतला. भाषांतर, संपादन, प्रकाशन आणि नेपाळमधील भव्य प्रकाशन सोहळ्याचे आयोजन या सर्व प्रक्रियेत त्यांचे मोलाचे योगदान राहिले.

काठमांडूमध्ये आयोजित प्रकाशन समारंभास नेपाळमधील गिर्यारोहण, साहित्य आणि शेर्पा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. नेपाळचे खासदार, एव्हरेस्टवीर आणि ख्यातनाम गिर्यारोहक मिंग्मा टेम्बा शेर्पा (मिंग्मा डेव्हिड) हे प्रमुख पाहुणे होते.

यावेळी बोलताना मिंग्मा टेम्बा शेर्पा म्हणाले, "हे पुस्तक साहस पर्यटन, नेपाळ आणि शेर्पा संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रसार करणारे महत्त्वाचे माध्यम ठरेल. या प्रेरणादायी कथा नेपाळी भाषेत वाचणे हा वाचकांसाठी विशेष अनुभव असेल. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे हे पुस्तक शेर्पा संस्कृती, वारसा आणि हिमालयीन इतिहास घडविणाऱ्या व्यक्तींचे एक मौल्यवान दस्तावेजीकरण आहे." या कार्यक्रमाला शेर्पा समाजातील शेकडो बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी भारतातून विशेष उपस्थिती म्हणून निलेश देशपांडे (Member, ८०००er Club), एव्हरेस्टवीर आशिष माने आणि रुपेश खोपडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना उमेश झिरपे म्हणाले, "शेर्पा हे पर्वतांचे आणि गिर्यारोहकांचे जीवनवाहक आहेत. हिमालयीन गिर्यारोहणातील त्यांचे योगदान अमूल्य आहे. जग शिखरावर उभ्या असलेल्या गिर्यारोहकांचे कौतुक करते; मात्र प्रत्येक यशस्वी मोहिमेच्या पाठीमागे शेर्पांचा त्याग, अनुभव, कौशल्य आणि धैर्य असते.

नेपाळमधील माझ्या प्रवासादरम्यान आणि गिर्यारोहण कारकिर्दीत मला अनेक शेर्पा बांधवांना जवळून भेटण्याची संधी मिळाली. हे पुस्तक म्हणजे माझे अनुभव आणि त्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकथांचा संग्रह आहे. त्यापैकी अनेकांनी गिर्यारोहणाबरोबरच शिक्षण, सामाजिक कार्य, उद्योजकता आणि समाजनेतृत्व यांसारख्या क्षेत्रांतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कथा जगापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली. म्हणूनच मी प्रथम माझ्या मातृभाषेत म्हणजे मराठीत हे पुस्तक लिहिले. त्यानंतर व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी इंग्रजी आवृत्ती प्रकाशित केली. माझे जिवलग मित्र अंग बाबू शेर्पा यांनी या कथा नेपाळी भाषेत आणण्याचा सातत्याने आग्रह धरला. या कथा सामान्य नेपाळी कुटुंबांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असा त्यांचा विश्वास होता. भाषांतर, संपादन, प्रकाशन आणि या प्रकाशन सोहळ्याच्या आयोजनात त्यांनी दिलेले योगदान या स्वप्नपूर्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.”  रोहन प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेली ही नेपाळी आवृत्ती भारत आणि नेपाळ यांच्यातील सांस्कृतिक आणि गिर्यारोहण क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories