गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे-डॉल्बीचा दणदणाट; सांगवीत 9 मंडळांवर गुन्हे दाखल

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे-डॉल्बीचा दणदणाट; सांगवीत 9 मंडळांवर गुन्हे दाखल

पिंपरी-चिंचवड : गणेश विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेचे डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टीम लावून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी 9 गणेश मंडळांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान डीजे मिक्सर, डीजे कन्सोल, लाईट कंट्रोल मशीन, लॅपटॉप, स्पीकर तसेच ट्रॅक्टर-ट्रॉलीसह डीजे सेट जप्त केला आहे. संबंधित मंडळांचे अध्यक्ष, डीजे मालक आणि चालक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने विशेष आदेश जारी केले होते. सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेच्या डीजे, डॉल्बी साउंड सिस्टीम तसेच ध्वनीप्रदूषण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या होत्या. त्यांना नियमांची माहिती देऊन लेखी सूचनाही देण्यात आल्या होत्या.

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विसर्जनाच्या सातव्या दिवशी एकूण 90 गणेश मंडळांच्या मिरवणुका निघाल्या. मिरवणुकीदरम्यान काही मंडळांकडून मोठ्या क्षमतेचे ध्वनियंत्रणा वापरली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ध्वनिक्षेपकांचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त असल्याने परिसरात ध्वनीप्रदूषण होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई केली.

या कारवाईत 5 डीजे मिक्सर, 3 डीजे कन्सोल, 1 लाईट कंट्रोल मशीन, 3 लॅपटॉप, 1 स्पीकर आणि ट्रॅक्टर-ट्रॉली व स्पीकरसह 1 डीजे सेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या उपकरणांची नोंद करून ती पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली. मंडळांचे पदाधिकारी आणि ध्वनियंत्रणेचे मालक-चालक यांनी आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

उत्सव साजरा करताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची जबाबदारी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर असल्याचे पोलिसांनी नमूद केले. अतिउच्च आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण तसेच लहान मुलांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे उत्सवाचा उत्साह राखताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहनही करण्यात आले.

आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही गणेश मंडळावर पूर्वसूचना न देता कठोर कारवाई केली जाईल. संबंधित डीजे, डॉल्बी साउंड सिस्टीम, मिक्सर आणि कन्सोल जप्त करण्यात येतील. अशा कारवाईसाठी संबंधित मंडळांचे पदाधिकारी व आयोजक स्वतः जबाबदार राहतील, असा स्पष्ट इशारा सांगवी पोलिसांनी दिला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त संदीप आटोळे आणि सहायक पोलीस आयुक्त मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिसांनी केली.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories