पिंपरी | २२ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पिंपरी परिसरात कारवाई करत एका २६ वर्षीय तरुणाकडून ५३ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल, दोन मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत गणेशोत्सव सुरक्षित आणि शांततेत पार पडावा यासाठी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गस्त घालत होते.
यावेळी पोलीस अंमलदार पोपट पाटे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राहुल रमेश चव्हाण (वय २६, रा. भारतमातानगर, दिघी, पुणे) याला २२ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास मोरवाडीतील १०० फुटी रोड, म्हसोबा देवस्थानासमोरील मोकळ्या जागेतून ताब्यात घेण्यात आले.
त्याची झडती घेतली असता ५३ हजार रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्तूल, दोन लोखंडी मॅगझिन आणि एक जिवंत राऊंड (काडतूस) मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपीला पिंपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल चव्हाण याच्याविरोधात यापूर्वीही दिघी पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत.