अनधिकृत केबल्स हटवा; PCMC आयुक्तांचा ऑपरेटर्सना इशारा!

अनधिकृत केबल्स हटवा; PCMC आयुक्तांचा ऑपरेटर्सना इशारा!

पिंपरी | २१ सप्टेंबर २०२६ : शहरातील वृक्ष, विद्युत खांब, इमारती, फुटपाथ तसेच इतर ठिकाणी अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या केबल्स तातडीने हटवाव्यात, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केबल ऑपरेटर्सना दिला आहे. शहरातील केबल व्यवस्था सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी पुढील एक वर्षात केबल्स भूमिगत करण्याचे लक्ष्य महापालिकेने निश्चित केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ओव्हरहेड केबल्सचे नियमन आणि प्रस्तावित मानक कार्यपद्धती (SOP) संदर्भात केबल ऑपरेटर्सच्या प्रतिनिधींसोबत मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात बैठक झाली. यावेळी ओव्हरहेड केबल्समुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या समस्या, शहराचे विद्रुपीकरण, अनधिकृत केबल्स, भूमिगत केबल व्यवस्था आणि प्रस्तावित SOP यावर चर्चा करण्यात आली.

आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केबल ऑपरेटर्सना दूरसंचार कायदा आणि महापालिकेच्या नियमांनुसार आवश्यक परवानगी घेऊनच केबल्स टाकण्याचे निर्देश दिले. शहरात भूमिगत केबल्ससाठी महापालिकेकडे सुमारे ६१० किलोमीटर लांबीचे पाईप्सचे जाळे उपलब्ध आहे. या पायाभूत सुविधांचा वापर करण्यासाठी केबल ऑपरेटर्सना अल्पदरात सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून त्यासाठी अधिकृत अर्ज करावा लागणार आहे.

बंद किंवा सध्या वापरात नसलेल्या केबल्सही तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑपरेटर्सनी अनधिकृत केबल्स स्वतःहून न काढल्यास महापालिका त्या हटवेल आणि आवश्यकतेनुसार संबंधित कनेक्शनही बंद केले जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.

दरम्यान, केबल टाकण्याची पद्धत, परवानगी प्रक्रिया, भूमिगत केबल व्यवस्थेचा वापर तसेच अनधिकृत आणि वापरात नसलेल्या केबल्स हटविण्यासाठी महापालिका मानक कार्यपद्धती (SOP) तयार करत आहे. बैठकीत उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि विविध केबल ऑपरेटर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories