पुणे | २१ सप्टेंबर २०२६ : नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी कौशल्य विकास विभागातर्फे २९ सप्टेंबर रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यापूर्वी युवकांची मुलाखतीसाठी तयारी व्हावी यासाठी २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील तालुकास्तरावरील प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. युवकांनी रोजगार मेळाव्यासह कौशल्यविकास, प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोजगार व उद्योजकता अधिकारी राजेश धर्माधिकारी यांनी केले.
भोर तालुक्यातील भेलेकरवाडी येथील जय हनुमान गणेश मंडळात जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद’ उपक्रमात धर्माधिकारी यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध असून इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस क्षेत्रातही संधी असल्याचे त्यांनी सांगितले. पदवीधर, आयटीआय तसेच विविध कौशल्याधारित पात्रता असलेल्या युवकांनी आपल्या पात्रतेनुसार मेळाव्यात सहभागी व्हावे. बेरोजगार युवकांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
रोजगार मेळाव्यापूर्वी आयटीआयमध्ये होणाऱ्या प्रशिक्षणात मुलाखतीला सामोरे जाण्याची पद्धत, संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, वेशभूषा आणि स्वतःचे प्रभावी सादरीकरण याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी युवकांना क्यूआर कोडद्वारे नोंदणी करता येणार आहे.
युवकांनी कौशल्य प्रशिक्षण, अप्रेंटिसशिप आणि स्वयंरोजगारासाठी उपलब्ध शासकीय योजनांचीही माहिती घ्यावी. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांनी कर्ज, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उपलब्ध शासकीय सुविधांचा पात्रतेनुसार लाभ घ्यावा, असे धर्माधिकारी यांनी सांगितले.
कापूरहोळ येथेही ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत युवकांना कौशल्य विकास विभागाच्या योजना, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.