पिंपरी-चिंचवड : पिंपळे सौदागर परिसरातील एका खोलीत पैसे लावून तीन पत्ती जुगार खेळत असलेल्या 10 जणांवर सांगवी पोलिसांनी कारवाई केली आहे. छाप्यात रोकड, मोटारसायकल, मोबाईल आणि पत्त्यांचा संच असा सुमारे 6.63 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलीस हवालदार शिवराम बाळासाहेब भोपे (गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी लक्ष्मण काळुंके (वय 30, पिंपळे सौदागर), इलियास चौधरी (वय 34, बोपोडी), अजहर खान (वय 36, पिंपळे सौदागर), लखनसिंग गुर्जर (वय 43, रुपीनगर), दिनेश कोठारी (वय 33, थेरगाव), रामवीर कुशवाहा (वय 40, पिंपळे सौदागर), रामदीनगुर्जर (वय 40, रुपीनगर), रोहित गुप्ता (वय 29, मोशी), विकी रजक (वय 25, पिंपळे निलख) आणि नारायण कुशवाहा (वय 24, पिंपळे सौदागर) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन मंदिरासमोरील पत्र्याच्या चाळीतील खोलीत जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान काही जण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पैसे लावून तीन पत्ती जुगार खेळत आणि खेळवत असल्याचे आढळल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी रोकड, मोटारसायकल, मोबाईल आणि पत्त्यांचा संच जप्त करून पंचनामा केला. जुगाराच्या अड्ड्याचे व्यवस्थापन कोण करत होते, याठिकाणी यापूर्वीही जुगार सुरू होता का आणि आर्थिक व्यवहार कशा प्रकारे होत होते, याचा तपास सुरू आहे.
बेकायदेशीर जुगारामुळे आर्थिक नुकसान, कर्जबाजारीपणा आणि इतर गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळू शकते. या प्रकरणाचा पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.