चारधाम हेलिकॉप्टर बुकिंगच्या नावाखाली 4. 40 लाखांची फसवणूक

चारधाम हेलिकॉप्टर बुकिंगच्या नावाखाली 4. 40 लाखांची फसवणूक

रावेत | 21 सप्टेंबर 2026 : चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर बुकिंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 66 वर्षीय व्यक्तीची 4 लाख 40 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फेसबुकवर हिमालयन हेली सर्व्हिसेस कंपनीची जाहिरात पाहिल्यानंतर संपर्क साधला असता आरोपीने चारधाम यात्रेची व्यवस्था करण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी रामनिवास बनारसी दास गुप्ता (वय 66, रावेत) यांनी फिर्याद दिली आहे. अभिषेक कपूर असे आरोपीचे नाव नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरी असताना मोबाइलवर फेसबुक या सोशल मीडियावर चारधाम यात्रेसाठी हिमालयन हेली सर्व्हिसेस कंपनीची जाहिरात त्यांच्या पाहण्यात आली. जाहिरात पाहून त्यांनी त्यावरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी आरोपीने स्वतःचे नाव अभिषेक असल्याचे सांगून चारधाम यात्रेची माहिती दिली.

चारधाम यात्रेसाठी आरोपीने 4 लाख 40 हजार रुपये ऑनलाइन पाठविण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने रक्कम पाठवली. त्यानंतर आरोपीने विमानाची तिकिटे आणि यात्रेसंबंधी इतर कागदपत्रे पाठवली. मात्र त्याबाबत संशय आल्याने फिर्यादीने आरोपीशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आरोपीने फोन उचलला नाही. त्यानंतर विमानाची तिकिटे रद्द करून संबंधित रक्कम स्वतः काढून घेत आरोपीने 4 लाख 40 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

हा प्रकार 27 जुलै ते 26 ऑगस्ट 2026 या कालावधीत घडला. याप्रकरणी 21 सप्टेंबर रोजी रावेत पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories