वाकड : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नगरसेवक राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने वाकडमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. एकाच दिवसात शेकडो नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
नगरसेवक राहुल कलाटे आणि समर्थ युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने म्हातोबा नगर परिसरात हे शिबिर घेण्यात आले. शिबिरात मॅमोग्राफीद्वारे स्तनाच्या कर्करोगाची तपासणी, CBC रक्त तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल आणि डोळ्यांची तपासणी करण्यात आली. गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचेही वाटप करण्यात आले.
राहुल कलाटे यांनी शिबिराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या. परिसरात यापुढेही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“सेवा हीच साधना आणि समाजहित हाच संकल्प या भावनेतून ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. नागरिकांना वेळेवर आवश्यक आरोग्य तपासण्या उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे,” असे कलाटे यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांनी शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या उपक्रमासाठी समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी सहकार्य केले. कलाटे यांनी त्यांचे आभार मानले.