news
clock

पिंपरीच्या माळरानावर देतो पण पुढची जबाबदारी तुमची......

यशवंतराव चव्हाण हे अण्णासाहेब मगरांना का असे म्हणाले?

विजय जगताप - पीसीएमसी न्यूज 

पिंपरी, ता. १२ - महाराष्ट्राचे भाग्यविधाते अशी ओळख असलेल्या यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती..! दूरदृष्टीचे नेते, नियोजन आणि महाराष्ट्राच्या पायाभूत रचनेचे शिल्पकार अशी ओळख असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्यामुळेच पिंपरी चिंचवड शहराचे भाग्य उजळले होते. ते कसे..?  हे आज आपण जाणून घेऊ या. 

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर राज्याची पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले. तेव्हा हवेलीचे आमदार अण्णासाहेब मगर होते. महाराष्ट्र राज्याला प्रगती पथावर नेण्यासाठी उद्योगधंद्यांसाठी धोरण असले पाहिजे, राज्यात  मोठमोठे उद्योग आले पाहिजे, तसेच उद्योगांसाठी राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी बेल्ट निर्माण केले व त्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या की राज्याला वेगवान बनवता येईल या दिशेने यशवंतराव चव्हाण कामाला लागले होते. 

दरम्यान, राज्यात उद्योगांसाठी अशा प्रकारचे धोरण आखले जात असल्याची माहिती आमदार अण्णासाहेब मगर यांना समजली. १९६० मधील  तो मे महिना होता. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या अत्यंत विश्वासातील स.गो बर्वे या अधिकाऱ्यांकडे तेव्हा या औद्योगिक धोरण निर्माण करण्याची जबाबदारी होती. एमआयडीसी असे नाव देऊन स्वतंत्र महामंडळ त्यासाठी निर्माण करण्यात आले होते. अण्णासाहेबांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन, " माझ्या हवेली मतदारसंघात पिंपरीच्या वेशीवर हजारो एकर मोकळी जमीन असून या ठिकाणी एमआयडीसी द्या" अशी मागणी यांनी केली. तेव्हा हिंदुस्थान अँटिबायोटिक्स या देशी व बकावुल्फ व रस्टन या खाजगी कंपन्या पिंपरीच्या परिसरात सुरू झाल्या होत्या, तसेच पिंपरीच्या आसपास स्वीडिश देशातील सँडविक, अल्फा लवाल, अटलास कापको या स्वीडिश कंपन्या सुरू झाल्या होत्या. 

परंतु, जागा मिळेल त्याप्रमाणे या कंपनी उभ्या राहिलेल्या असल्याने स्वतंत्रपणे या भागात एमआयडीसी झाल्यास संयुक्तिक ठरेल या दृष्टीने अण्णासाहेबांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री चव्हाण यांनी तात्काळ संमती दिली. "तुमच्या पिंपरीच्या माळरानावर एमआयडीसी देतो, परंतु त्यास पुढे सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची..? असे मुख्यमंत्र्यांनी म्हणत अण्णासाहेबांच्या कोर्टात चेंडू टाकला. अण्णासाहेब देखील जिद्दीने मग कामाला लागले. हा निर्णय स.गो. बर्वे यांना कळविण्यात आला. 

मग जागा (स्थळ )पाहण्यासाठी एक दिवस त्यांनी निश्चित केला. ३ फेब्रुवारी १९६१ या दिवशी बर्वे साहेब पिंपरी जवळ आपल्या अमबॅसिडर गाडीने आले. अण्णासाहेब पिंपरीच्या वेशीवर त्यांच्या स्वागताला  तयार होतेच. मात्र अण्णासाहेब हे बर्वे यांच्या गाडीत न बसता," तुम्ही माझ्या मागे मागे गाडी आणा, कोणती जागा किती व कशी घ्यायची हे मी दाखवतो" असे म्हणत अण्णासाहेबांनी आपली बुलेट काढली. आमदार बुलेटवर पुढे तर मागे ॲम्बेसेडर  कार मध्ये अधिकारी असे चित्र प्रथमच  तेव्हा पाहावयास मिळत होते. जागा दाखवून झाल्यानंतर बर्वे मुंबईला गेले. पुढे १ ऑगस्ट १९६२ ला पिंपरी येथे एमआयडीसी स्थापन झाली. ६० टक्के पिंपरीकरांची तर ४० टक्के भोसरीकरांची जागा यासाठी संपादन करण्यात आली होती. अण्णासाहेबांची धडपड व प्रामाणिक भावना ओळखून यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना केलेले सहकार्य यामुळे पुढे पिंपरी चिंचवडने आशिया खंडात नाव कमावले. आज यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने ही आठवण शहर विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories