नोकरीचे आमिष दाखवून २१ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. १७ - भारतीय रेल्वे आणि वन विभागामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तीन तरुणांची तब्बल २१ लाख ८७ हजार ७३ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ही फसवणूक ४ एप्रिल २०२३ ते जून २०२६ या कालावधीत ऑनलाईन करण्यात आली. १६ जूनला या प्रकरणी आरोपींविरुद्ध काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हितेश सुरेश कुलकर्णी (वय ३५, रा. पुणे) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
आरोपींची नावे विक्रम पवार (रा. जालना), निलेश वाकचौरे (रा. संगमनेर, अहिल्यानगर) आहेत. आणखी काहीजण यात सामील असण्याची शक्यता आहे.
आरोपींनी फिर्यादी तसेच साक्षीदारांना भारतीय रेल्वे आणि वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून फिर्यादींकडून ७ लाख ८७ हजार रुपये, तसेच दोन साक्षीदारांकडून अनुक्रमे ४ लाख ३० हजार रुपये आणि ९ लाख ७० हजार ७३ रुपये असे एकूण २१ लाख ८७ हजार ७३ रुपये घेतले आणि त्यानंतर आरोपींनी त्यांना बनावट नियुक्ती पत्रे व इतर कागदपत्रे देऊन त्यांची फसवणूक केली.
या प्रकरणी आरोपींवर काळेवाडी पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३१८ (४),३३६ (२), ३३८,३३६ (३),३४०,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक झालेली नाही.