तंबाखूजन्य पदार्थांच्या नियमनासाठी सरकार COTPA कायदा अधिक काटेकोरपणे लागू करणार
(COTPA - Cigarettes and Other Tobacco Products Act, 2003)
पुणे, ता. 25 - तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रभावी नियमानासाठी महाराष्ट्र सरकार COTPA - Cigarettes and Other Tobacco Products Act, 2003 कायद्याची अधिक काटेकोर अंमलबजावणी करणार आहे. याबाबतचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
सदर कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करताना तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि प्रचारावर प्रभावी नियंत्रण ठेवले जाणार आहे. त्यासाठी राज्यातील तालुका-स्तरीय तंबाखू नियंत्रण समित्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. त्याद्वारे जनजागृती आणि कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल.
राज्यातील प्रत्येक तहसील-स्तरीय समितीला दरवर्षी निधी मिळेल. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समित्यांना सक्रिय भूमिका बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता विभागाने गठीत केलेल्या तहसील व्यसनमुक्ती समितीच्या बैठकीनंतर लगेचच आता तहसील स्तरावरील तंबाखू नियंत्रण समितीची बैठक घेतली जाईल. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.