'राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये' देशात महाराष्ट्र आघाडीवर, राज्यातील ४ ग्रामपंचायतींना पुरस्कार
'राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये' देशात महाराष्ट्र आघाडीवर, राज्यातील ४ ग्रामपंचायतींना पुरस्कार
पुणे, ता. ११ - केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या 'राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५' मध्ये महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर आघाडी घेतली आहे. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या देशभरातील पंचायतींमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी जलसमृद्ध आणि बालस्नेही या दोन महत्त्वाच्या गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या पुरस्कारांचे वितरण ३ जून २०२६ रोजी नवी दिल्ली येथे एका विशेष सोहळ्यात होणार आहे.
सदर पुरस्कार 'दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार' आणि 'नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार' अशा दोन प्रमुख श्रेणींमध्ये दिले जातात. यामध्ये गावांतील गरिबी निर्मूलन, आरोग्य, सुशासन आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या ९ प्रमुख संकल्पनांवर आधारित कामगिरीचे मूल्यमापन 'पंचायत प्रगती निर्देशांक' (PAI 2.0) नुसार करण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील इटगाव ग्रामपंचायतीने 'बालस्नेही पंचायत' श्रेणीत देशात प्रथम क्रमांक पटकावून १ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. रायगड जिल्ह्यातील खारीवली (ता. खालापूर) ग्रामपंचायतीने 'जलसमृद्धपंचायत' श्रेणीत देशात प्रथम स्थान मिळवत १ कोटी रुपयांचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. नाशिक जिल्ह्यातील निंबळे (ता. चांदवड) ग्रामपंचायतीने पारदर्शक प्रशासनासाठी 'सुशासन' श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवून ७५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. रायगड जिल्ह्यातील चांभारली (ता. खालापूर) ग्रामपंचायतीने 'सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा' या विषयात देशात द्वितीय स्थान मिळवत ३७.५ लाख रुपयांचे बक्षीस मिळवले आहे.