पिंपरी-चिंचवड | २६ नोव्हेंबर २०२६ : अविरत श्रामदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड महानगपालिका आणि पी.एम.आर.डी.ए यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (29 नोव्हेंबर) इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. इंद्रायणी नदीचे संवर्धन, स्वच्छता आणि पाणी बचतीबाबत जनजागृती करण्याचा या उद्देश आहे. या सायक्लोथॉनमध्ये सायकलस्वारांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. यामुळे संबंधित मार्गांलकील वाहतूक वळण्यात येणार आहे.
पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी याबाबत आदेश दिले असून रविवारी (29 नोव्हेंबर) सकाळी चिखली, मोशी आणि कृष्णानगर परिसरातील मार्गांवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. या मार्गावरून जाणाऱ्यांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 29 नोव्हेंबरला पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत चिखली वाहतूक विभागाच्या हद्दीत १५ मार्गांवर आवश्यकतेनुसार प्रवेशबंदी लागू केली जाईल.
बोऱ्हाडेवाडी चौकातून गोल्ड जिम चौकाकडे जाणारी वाहतूक भारतमाता चौकातून देहू-आळंदी रस्त्याने वळवण्यात येईल. तर, गोल्ड जिम चौकातून बोऱ्हाडेवाडी चौकाकडे जाण्यासाठी वाहनचालकांनी शिव रस्त्याने देहू-आळंदी रस्ता गाठावा.
संतनगर चौकातून स्पाईन सिटी मॉलकडे जाणाऱ्या वाहनांनी संतनगर चौकात डावीकडे वळून वैष्णव माता मार्गाने टेल्को रस्त्याकडे जावे. पुणे नाशिक हायवे वरील आप्पा पाटील चौकातून (आरटीओ लिंक रोड) आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या वाहनांनी भारतमाता चौकातून देहू-आळंदी रस्त्याचा वापर करावा.
सरदार चौकातून मातेरे हाऊस चौकाकडे जाणारी वाहतूक इंद्रायणीनगर कॉर्नरमार्गे टेल्को रस्त्यावर वळवण्यात येईल. संतनगर ते आरटीओ कार्यालय या मार्गावर केवळ जड वाहनांना प्रवेशबंदी असेल. या वाहनांनी पांजरपोळ चौकातून किंवा संतनगर चौकातून वैष्णव माता मार्गाने टेल्को रस्त्याने जावे. जाधववाडीतून जाधव सरकार चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी देहू-आळंदी रस्त्याचा वापर करावा.
नेवाळे वस्तीतून चेरी चौकाकडे जाणारी वाहतूक देहू-आळंदी रस्त्याने, तर पूर्णानगरातून चेरी चौकाकडे जाणारी वाहतूक बर्ड व्हॅली चौकातून टेल्को रस्त्याने वळवण्यात येईल. साने चौकातून कृष्णानगर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी देहू-आळंदी रस्त्याचा वापर करावा.
थरमॅक्स चौकातून कृष्णानगर भाजी मंडई चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी टेल्को रस्त्याने जावे. मोरे वस्तीतून संविधान चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी टॉवर लाइनमार्गे देहू-आळंदी रस्ता गाठावा, तर कृष्णानगरातून संविधान चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी थरमॅक्स चौकातून जावे.
टॉवर लाइन चौकातून त्रिवेणीनगर चौकाकडे जाणारी वाहतूक गणेशनगरमार्गे देहू-आळंदी रस्त्यावर वळवण्यात येईल. दुर्गानगर चौकातून त्रिवेणीनगर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी टेल्को रस्त्याने थरमॅक्स चौकातून जावे.
वरील नमूद मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी लागू होईल. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना निर्बंधातून वगळण्यात आले आहे. वाहनचालकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे.