संविधान दिनी महापालिकेत डॉ. आंबेडकरांना अभिवादन; प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

संविधान दिनी महापालिकेत डॉ. आंबेडकरांना अभिवादन; प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

पिंपरी-चिंचवड : भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या संविधानिक मूल्यांचा जागर करण्यात आला. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीत दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुता या मूल्यांच्या जपणुकीचा निर्धार यावेळी करण्यात आला.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केला. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येणारा संविधान दिन हा देशाच्या लोकशाही परंपरेचा आणि नागरिकांच्या अधिकार व कर्तव्यांचा गौरव करणारा दिवस आहे. संविधानाने दिलेले अधिकार, समानतेची भावना आणि सामाजिक न्यायाची संकल्पना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले.

लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी संविधानातील मूल्यांचे केवळ स्मरण करून चालणार नाही, तर ती प्रत्यक्ष जीवनात अंगीकारणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी, न्याय आणि सन्मान मिळावा, यासाठी सर्वांनी संविधानाप्रती आपली जबाबदारी जपली पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.

या कार्यक्रमाला नगररचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे, सहआयुक्त मनोज लोणकर, सहशहर अभियंता विनय ओहोळ, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बुकतर, तुकाराम गायकवाड, संतोष सुरवसे, सचिन खरात, पिंटू जामदार, गणेश पुंडा आणि वैभव भालेराव यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories