पिंपरी | २६ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड विद्यापीठात (PCU) भारतीय संविधान दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासह न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानिक मूल्यांचे प्रामाणिकपणे आचरण करण्याची प्रतिज्ञा उपस्थितांनी घेतली.
विद्यापीठाचा ग्रंथालय विभाग आणि स्कूल ऑफ लॉ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधानाचे महत्त्व आणि त्यातील मूल्यांविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संविधान दिनाचे औचित्य साधून पीसीयूच्या मध्यवर्ती ग्रंथालयात संविधान आणि कायदेविषयक विशेष ग्रंथ तसेच दस्तऐवजांचे प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
‘संविधान मार्गदर्शक’ या विषयावर मार्गदर्शन करताना आशिष देशपांडे यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद केले. शासनव्यवस्था, नागरिकत्व आणि सामाजिक प्रगतीच्या दृष्टीने भारतीय संविधान हा अमूल्य दस्तऐवज आहे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार प्रमुख स्तंभ आहेत. संविधानिक हक्क आणि मूलभूत कर्तव्यांची जाणीव ठेवून सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी युवा वर्गाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पीसीयूचे कुलपती तथा पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पीसीयू व्यवस्थापन समितीचे सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्वांना संविधान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.