पिंपरी-चिंचवड | २६ नोव्हेंबर २०२६ : भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा संदेश देणाऱ्या सांगवी येथील नूतनीकृत भारतीय संविधान शिल्पाचे लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते संविधान दिनानिमित्त करण्यात आले. या शिल्पाच्या माध्यमातून संविधानाविषयी जागरूकता निर्माण होण्यासह लोकशाही मूल्यांच्या जपणुकीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याचे प्रतिपादन जगताप यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३२ मधील सांगवी येथील भारतीय संविधान शिल्पाच्या नूतनीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. संविधान दिनाचे औचित्य साधून गुरुवारी या शिल्पाचे लोकार्पण करण्यात आले.
संविधान दिनीच नूतनीकृत शिल्पाचे लोकार्पण होत असल्याने विशेष आनंद होत आहे. भारतीय संविधानातील मूलभूत मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे शिल्प नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरेल. संविधानाविषयी आदर आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी या शिल्पाची महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असे सांगत आमदार शंकर जगताप यांनी नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, शहर सुधारणा समितीचे सभापती संजय काटे, ‘ह’ प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे, नगरसदस्य हर्षल ढोरे, पल्लवी जगताप, उज्वला ढोरे, नगररचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे, माजी नगरसदस्य संतोष कांबळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी संतोष कोराड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकार्पण सोहळ्यादरम्यान उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्याची मूल्ये जपण्यासह सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, समानता, बंधुता तसेच राष्ट्राची एकता आणि एकात्मता कायम राखण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
नूतनीकृत संविधान शिल्पामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकिकात भर पडणार असून, भारतीय संविधानाचा गौरवशाली वारसा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.